नगर परिषदेने ठोकले साई मंदिर सभागृहाला सील

0
10

गडचिरोली, ता.१०: वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या येथील चामोर्शी मार्गावरील साई मंदिर सभागृहाला अखेर आज(ता.१०) नगर परिषदेने सील ठोकले. यामुळे साई मंदिराचे सर्वेसर्वा असलेल्या श्रीराम सेवा मंडळाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये खळबळ माजली आहे.
श्रीराम सेवा मंडळातर्फे साई मंदिराचे कामकाज बघितले जाते. या मंदिरालगतच असलेल्या नगर परिषदेच्या मालकीच्या खुल्या जागेवर ट्रस्टने सभागृह बांधून त्याचा वापर व्यावसायिक कामाकरिता केला. गेल्या अनेक वर्षांपासून हा प्रकार सर्रास सुरु होता. सभागृह खुल्या जागेवर बांधण्यात आले असून, कुणाचीही परवानगी घेण्यात आली नाही. तसेच ट्रस्टच्या कारभारात पारदर्शकता नसल्याने व साई मंदिर सभागृहाच्या भाडयाच्या रकमेपोटी मिळणाऱ्या उत्पन्नाबाबत चोख व्यवहार नसल्याने त्यावर कारवाई करण्याची मागणी लोकशाही दिनात जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली होती. तसेच सामाजिक कार्यकर्ते कैलाश शर्मा यांनी इंदिरा गांधी चौकात बेमुदत उपोषणही केले होते. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी चाैकशी करुन श्रीराम सेवा मंडळावर कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते. त्याअनुषंगाने आज जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये नगर परिषदेने साई मंदिर सभागृहाला सील ठोकले. यावेळी नगर परिषदेतील रचना सहायक श्री.मैंद, कनिष्ठ अभियंता श्री.पुनवटकर, कनिष्ठ लिपिक श्री.आखाडे, तक्रारकर्ते कैलाश शर्मा, श्री. कलंत्री, डॉ. किरण मडावी उपस्थित होते. सध्या सभागृहाला सील ठोकण्यात आले असले, तरी भविष्यात ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांची चौकशी होऊन कडक कारवाई होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. अशाच प्रकारच्या अनियमितता सेमाना देवस्थान ट्रस्टमध्येही असल्याबाबतची तक्रार कैलाश शर्मा यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. त्यामुळे पुढचा क्रमांक सेमाना देवस्थान ट्रस्टचा लागेल, असेही बोलले जात आहे.