समायोजनच्या नावावर बदली झालेल्या विषयतज्ज्ञांची थट्टाच!

0
10

गोंदिया,दि.23 : ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळा शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात याव्यात तसेच विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती व्हावी यासाठी सर्व शिक्षा अभियानअंतर्गत गोंदिया जिल्ह्यात सन २००६ मध्ये कंत्राटी तत्त्वावर विषयतज्ज्ञ शिक्षकांची नेमणूक करण्यात आली. मात्र, सन २०१३ मध्ये समायोजन करण्याच्या नावावर नियुक्त १०३ विषयतज्ज्ञांपैकी जवळपास ४० विषयतज्ज्ञांना राज्यातील दुसर्‍या जिल्ह्यात पाठविण्यात आले. आपले स्थानांतरण जिल्ह्यात व्हावे, यासाठी विषयतज्ज्ञांनी गोंदिया शिक्षण विभागापासून मंत्रालयातील शिक्षण विभागाचे उंबरठे झिजविले. मात्र, अद्यापही परजिल्ह्यात गेलेले विषयतज्ज्ञ जिल्ह्यात आलेले नसून समायोजनच्या नावावर विषयतज्ज्ञांची थट्टाच सुरू आहे.
सर्व शिक्षा अभियानअंतर्गत सन २००६ पासून गोंदिया जिल्ह्यात कंत्राटी तत्त्वावर १०३ जणांची विषयतज्ज्ञ म्हणून नियुक्ती करण्यात आली. परंतु समायोजनच्या नावावर सन २०१३ मध्ये २० विषयतज्ज्ञांची नांदेड जिल्ह्यात तर २० विषयतज्ज्ञांची इतर जिल्ह्यात अशा एकूण ४० विषयतज्ज्ञांची बदली करण्यात आली. बदली करतेवेळी विषयतज्ज्ञांना आवश्यक कालावधी पूर्ण केल्यानंतर जिल्ह्यात पुन्हा नियुक्ती देण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले. मात्र, हा कालावधी लोटल्यानंतर जिल्ह्यात पुनर्स्थापना मिळत नसल्याने अनेक विषयतज्ज्ञांनी जिल्ह्यात तसेच मुंबई मंत्रालयासमोर आंदोलन केले. याशिवाय जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी शालेय शिक्षण व क्रीडा मंत्री विनोद तावडे यांना पत्र लिहून विषयतज्ज्ञांची मूळ जिल्ह्यात व पूर्ववत पदस्थानेवर नियुक्ती करण्यात यावे असे विनंती पत्रही पाठविले. त्यातच शासनाच्या ग्राम विकास विभागाने प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र या महत्त्वकांक्षी प्रकल्पाअंतर्गत विद्या प्राधिकरण, प्रादेशिक विद्या प्राधिकरण व जिल्हा शैक्षणिक सातत्त्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था येथील रिक्त पदांवर प्रती नियुक्ती देण्यासाठी निवड झालेल्या संबंधित जिल्हा परिषदेमधील शिक्षक तसेच विषयतज्ज्ञांना नियुक्तीसाठी तात्काळ कार्यमुक्त करण्याची कार्यवाही करावी असे आदेश काढले. मात्र, त्या आदेशाची अंमलबजावणीही अद्याप झालेली नाही. मंत्र्यांचा पाठपुरावा तसेच ग्राम विकास विभागाने काढलेला आदेश या सर्वांची पायमल्ली करीत शिक्षण विभाग आपल्या भूमिकेवर ठाम असल्याने विषयतज्ज्ञ शिक्षकांची हा विभाग थट्टाच करीत असल्याचे चित्र दिसून येत आहे