संगनमताने रेतीचा अवैध उपसा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा- विजय वडेट्टीवार

0
21

मुंबई,दि.29:- महसूल आणि पोलीस विभाग अधिकारी यांच्या संगनमताने भंडारा जिल्ह्यातील पवनी येथून दररोज ५०० ट्रक रेतीचा अवैध उपसा करून नागपूरला पुरवठा करीत असल्या प्रकरणाची दखल घेऊन संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी शुक्रवारी विधानसभेत केली.

महसूल व वन विभागाच्या सन २०१९-२० च्या पुरवणी मागण्यांवरील चर्चेत भाग घेतांना वडेट्टीवार यांनी ही मागणी केली. ते म्हणाले की, या रेतीचा अवैध उपसा प्रकरणाशिवाय सिरोंचा तालुक्यात गोदावरी नदीतून तेलंगणा राज्यातील ट्रेडर मोठ्याप्रमाणात रेतीचा उपसा करून राज्याचा महसूल बुडवित आहेत. तेलंगणातील रेती ट्रेडर्सना शेतकरी दाखवून महसूलचे अधिकारी त्यांना १२ रूपये प्रति ब्रास दर लावतात. तीन तीन मिटर पर्यंत रेतीउपसा करून ही १२ रूपये प्रति ब्रासची रेती तेच ट्रेडर तेलंगणामध्ये ५००० रूपये दराने विकतात. यात राज्याचा महसूल बुडतो. या प्रकरणावर तातडीने कारवाई करण्याची आवश्यकता असल्याचे वडेट्टीवार यांनी नमूद केले.

याशिवाय पुणे जिल्ह्यातील पर्वती येथे महसूल विभागातील अधिकाऱ्यांनी घोटाळा केला आहे. रोहीत शेंडे या वकिलाने उपसंचालक भुमी अभिलेख वानखेडे यांच्यासोबत व्यवहार करून पर्वती येथील १०० कोटी रूपयांच्या ८० गुंठे जमिनीचा व्यवहार केवळ १ कोटी ७० लाख रूपयात केला. त्यामुळे उपसंचालक भुमी अभिलेख वानखेडे यांचा वजीर कोण असा सवालही वडेट्टीवार यांनी यावेळी केला.

ते पुढे म्हणाले की, पर्वती येथील ८० गुंठे जमिन ही विनोबा भावे यांच्या भूदान चळवळीतून एका दलित कुटूंबाला देण्यात आली होती. ती मिळावी म्हणून त्या दलित कुटूंबाच्या वारसांनी अर्ज केला तेव्हा उपसंचालक भुमी अभिलेख यांचा या प्रकरणात संबंध असल्याचे समोर आले. त्यामुळे या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन चौकशी करावी, अशी मागणी वडेट्टीवार यांनी सभागृहात लावून धरली. यावर उत्तर देतांना महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी वानखेडे यांना निलंबित करण्यात येईल, अशी ग्वाही दिली.