महाराष्ट्रातील पर्यटक सुखरुप : 1,000 पर्यटकांशी संपर्क

0
12

मुंबई : नेपाळच्या भूकंपानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वत: मदत कार्यावर लक्ष देऊन आहेत. शासनाची आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा युद्ध पातळीवर मदत कार्य करत आहे. मुंबई व नवी दिल्ली येथील नियंत्रण कक्षातून रविवारी सायंकाळी 6.00 वाजेपर्यंत 1 हजार पर्यटकांशी संपर्क साधण्यात आला. राज्यातील सर्व पर्यटक सुखरुप असून नियंत्रण कक्षात विचारणा करण्यात आलेल्या सर्वांशी संपर्क झाला आहे. आतापर्यंत महाराष्ट्राची कोणतीही व्यक्ती मृत झाल्याची अधिकृत माहिती प्राप्त झालेली नाही, असे राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने स्पष्ट केले आहे.

मुख्यमंत्र्यांनी काल भूकंपाच्या घटनाक्रमानंतर महाराष्ट्राच्या प्रत्येक नागरिकाला राज्यात सुखरूप पोहचविण्यासाठी राज्य शासन प्रयत्न करत आहे, असे स्पष्ट केले होते. त्यानंतर तातडीने नवी दिल्ली आणि मुंबई येथे नियंत्रण कक्ष उभारण्यात आले आहेत. राज्यातील विविध भागातून जिल्हाधिकारी व पर्यटन कंपन्यांकडून प्राप्त माहितीनुसार राज्यातील अंदाजे हजारावर पर्यटक नेपाळमध्ये पर्यटनाला गेले असल्याचे कळते. राज्य शासनाने महाराष्ट्र सदन, नवी दिल्ली येथील महाराष्ट्र सदनातील अतिरिक्त निवासी आयुक्त समीर सहाय यांच्या नेतृत्वाखाली स्वतंत्र सेलची स्थापना केली असून हेल्पलाईन देखील सुरु करण्यात आली आहे. नवी दिल्ली येथील हेल्पलाईन क्रमांक 011-23380324/23380325 आहे. मुंबई मंत्रालयातील नियंत्रण कक्षातील 022-22027990 हा आपत्कालीन क्रमांक म्हणून जाहीर करण्यात आला आहे. यासोबतच मुंबई उपनगर, जिल्हाधिकारी कार्यालयात नियंत्रण कक्ष सुरु करण्यात आला असून त्यांचा संपर्क क्रमांक 022-26556499 असा आहे. मंत्रालयातील नियंत्रण कक्ष हा आपत्ती व्यवस्थापन विभागाचे संचालक सुहास दिवसे यांच्या नेतृत्वात एक चमू 24 x 7 कार्यरत आहे. या कार्यालयातून शनिवारपासून पर्यटकांचे नातेवाईक, पर्यटक, भारत सरकार यांच्याशी संपर्काचे काम सुरु आहे.

दिनांक 26 एप्रिल 2015 रोजी सायंकाळी 6.00 वाजेपर्यंत महाराष्ट्र सदन नवी दिल्ली व मंत्रालयातील कक्षातून 1000 व्यक्तींशी संपर्क साधण्यात आला आहे. दरम्यान, काठमांडू येथून विमान सेवा दुपारी विस्कळीत झाल्यामुळे रात्री उशिरापर्यंत मोठ्या प्रमाणात पर्यटक परत येण्याची शक्यता दिल्ली येथील नियंत्रण कक्षातील अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. नवी दिल्ली येथील महाराष्ट्र सदनाचे अधिकारी व कर्मचारी विमानतळावर तैनात असून महाराष्ट्रात पर्यटकांना परत जाण्यासाठी ते व्यवस्था करीत आहेत. महाराष्ट्र सदनामध्ये पर्यटकांच्या निवासाची व्यवस्था करण्यात आली असून आवश्यक असेल त्यांना रेल्वे टिकीटची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री एकनाथ खडसे हे परिस्थितीवर लक्ष ठेऊन असून महाराष्ट्र सदन, नवी दिल्ली यांच्या सतत संपर्कात आहेत. सर्व विभागीय आयुक्त आणि सर्व जिल्हाधिकारी यांनी नेपाळ येथे गेलेल्या त्यांच्या जिल्ह्यातील पर्यटकांबाबत माहिती मिळविण्यासाठी दूरदर्शन, आकाशवाणी, स्थानिक टि.व्ही चॅनल तसेच वर्तमानपत्रामध्ये जाहीर आवाहन केले आहे. पर्यटकांची माहिती संकलित करण्याची कार्यवाही सुरु आहे. मुंबई महानगरपालिका आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे पथक सज्ज ठेवण्यात आले असून आवश्यकता भासल्यास सदर पथकांना शोध व बचाव कार्यासाठी नेपाळ येथे पाठविण्यात येईल.

दरम्यान, पुण्यातून ट्रेकींगसाठी गेलेल्या 45 लोकांच्या चमूसोबत राज्य शासनाच्या नियंत्रण कक्षाचा संपर्क झाला आहे. नामशेबाजार या परिसरात हा चमू सुरक्षित आहे. दोन्ही बाजूने रस्ते मार्ग तुटल्याने त्यांना या ठिकाणावरुन हलता येत नाही. त्यांना सुरक्षितपणे हलविण्याचा प्रयत्न शासनाकडून सुरु आहे. दरम्यान, गिरीप्रेमी ट्रॅव्हल्स, हेरंब ट्रॅव्हल्स, व्यंकेटेश ट्रॅव्हल्स आदी कंपनीचे पर्यटक सुखरुप असून ते महाराष्ट्रात परत येत आहेत. आतापर्यत मुंबईच्या नियंत्रण कक्षाकडून संपर्क झालेल्यामध्ये ठाण्यातील 7, पिंपरी चिंचवड येथील 8, सातारा येथील 6, हडपसर येथील 5, नांदेड येथील 48, वाशिम-अकोला-यवतमाळ या जिल्ह्यातील लुंबिनी येथे पर्यटनाला गेलेले 156, सांगली जिल्ह्यातील खानापूर-आटपाडी परिसरातील 100 पर्यटकांचा सहभाग आहे. पर्यटकांकडे जीवनावश्यक वस्तूंचा पुरेसा साठा असून राज्यातील पर्यटकांच्या आप्तस्वकीयांनी संयम बाळगावा, सर्व पर्यटक सुखरुप परत येतील, असे आवाहन राज्य शासनाकडून करण्यात आले आहे.