नऊ राज्यांना मिळणार नवे राज्यपाल

0
6

वृत्तसंस्था
नवी दिल्ली,-संसदेच्या अर्थसंकल्पी अधिवेशनानंतर नऊ राज्यांना नवे राज्यपाल मिळणार आहेत, अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी आज रविवारी दिली.
सध्या एका राज्यपालाकडे चार राज्यांचा आणि पाच राज्यपालांकडे किमान दोन राज्यांचा अतिरिक्त कार्यभार आहे. सध्या संसदेचे अर्थसंकल्पी अधिवेशन सुरू आहे. ते संपल्यानंतर आम्ही राज्यपालांच्या रिक्त जागा भरण्याबाबत निर्णय घेणार आहोत, असे राजनाथसिंह यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले.
बिहार, पंजाब, आसाम, हिमाचलप्रदेश, मेघालय, मिझोरम, मणिपूर, त्रिपुरा आणि तेलंगणा या राज्यांमध्ये राज्यपालपद रिक्त आहे. याशिवाय पुद्दुचेरी या केंद्रशासित प्रदेशातही नायब राज्यपालपद रिक्त आहे. पश्‍चिम बंगालचे राज्यपाल केसरीनाथ त्रिपाठी यांच्याकडे बिहार, मेघालय आणि मिझोरमचा अतिरिक्त कार्यभार आहे. तर, नागालॅण्डचे राज्यपाल पद्मनाभ आचार्य यांच्याकडे आसाम आणि त्रिपुराचा अतिरिक्त पदभार आहे. हरयाणाचे राज्यपाल कप्तानसिंह सोळंकी यांच्याकडे पंजाबसोबतच चंदीगडचे प्रशासक म्हणून अतिरिक्त जबाबदारी सोपविण्यात आली असून, राजस्थानचे राज्यपाल कल्याणसिंह यांच्याकडे हिमाचलप्रदेश आणि उत्तराखंडचे राज्यपाल के. के. पॉल यांच्याकडे पुद्दुचेरीच्या नायब राज्यपालपदाची अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली आहे.