मंत्रिमंडळ विस्तार जुलैच्या पहिल्या आठवड्यात?

0
10

मुंबई दि.११:- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होणार असून, यामध्ये भाजपच्या पाच तर शिवसेनेच्या दोन जणांची वर्णी लागणार असल्याचे समजते. विस्ताराबरोबर खांदेपालटाचीही सध्या चर्चा रंगली आहे.

केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सत्ता आल्यानंतर राज्यात “केंद्रात नरेंद्र राज्यात देवेंद्र‘ ही घोषणा रास्त ठरली व सत्ता परिवर्तन झाले. भाजपचे पहिले मुख्यमंत्री होण्याचा मान देवेंद्र फडणवीस यांना मिळाला. यानंतर शिवसेना सत्तेत सहभागी झाली तरीही मंत्रिमंडळाचा विस्तार झाला नव्हता. भाजपच्या अनेक मंत्र्यांकडे चार-पाच खाती आहेत. तरीही मंत्रिमंडळाचा विस्तार व्हावा, यासाठी भाजपचे अनेक मातब्बर आमदार प्रयत्नशील आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस यांना वारंवार मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत विचारणा होत असे. यातच महामंडळाच्या नियुक्‍त्याही रखडल्या आहेत. त्यामुळे आणखीनच नाराजीत भर पडली आहे. याचा विचार करता जुलैच्या पहिल्या आठवड्यात मंत्रिमंडळाच्या विस्ताराला मुहूर्त मिळणार असे समजते. या विस्तारात भाजपतून जयकुमार रावळ, चैनसुख संचेती, डॉ. संजय कुटे, भाऊसाहेब फुंडकर, सुभाष देशमुख, शिवाजीराव नाईक, डॉ. विजयकुमार गावित, संभाजी निलंगेकर, आशिष शेलार यांच्या नावांची चर्चा आहे. यापैकी पाच जणांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडू शकेल, तर शिवसेनेच्या दोन जागांसाठी अर्जुन खोतकर, गुलाबराव पाटील, संजय शिरसाट, सुरेश साळुंखे यापैकी दोघांची वर्णी लागण्याची शक्‍यता आहे. दरम्यान, खांदेपालट करण्यास भरपूर वाव असला तरीही शिवसेना आणि भाजप यामध्ये खातेवाटप झाले आहे. त्यामुळे शिवसेनेच्या मंत्र्यांची इच्छा असूनही त्यांना खांदेपालटात नवीन खाती मिळण्याची शक्‍यता कमी दिसते.