वैद्यकीय परिषदेने डॉक्टर्सना फटकारले

0
10

मुंबई ,दि.११: एखादा आजार झाल्यावर फॅमिली डॉक्टरकडे जाण्यापेक्षा स्पेशालिस्टकडे जाण्याचा रुग्णांचा कल असतो. पण अनेकदा डॉक्टरने लावलेली स्पेशालिस्टची पदवी ही प्रमाणित अभ्यासक्रमातून मिळालेली नसते. यामुळे रुग्णांची फसवणूक होत असल्याचे लक्षात आल्यावर महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेने राज्यातील सुमारे ६०० ते ७०० डॉक्टरांना पत्र पाठवली असल्याचे परिषदेचे अध्यक्ष डॉ. किशोर टावरी यांनी सांगितले.

डॉक्टरने संपादित केलेली पदवी पाहून अनेकदा रुग्ण विशिष्ट आजारावर उपचार घेण्यासाठी त्याच डॉक्टरकडे जातात. एमडी, एमएस अशा पदव्या नावापुढे लावलेल्या डॉक्टरांनी घेतलेली पदवी अनेकदा प्रमाणित नसते. या संदर्भातील ३० हून अधिक तक्रारी राज्यातील विविध भागांतून परिषदेकडे आल्या. यानंतरच अशा डॉक्टरांचा शोध घेऊन परिषदेने पत्र पाठविली आहेत.

एमबीबीएसचा अभ्यासक्रम अनेक डॉक्टरांनी राज्यातूनच पूर्ण केला आहे. मात्र त्या पुढील शिक्षण त्यांनी परदेशातील महाविद्यालयातून घेतले आहे. तो अभ्यासक्रम प्रमाणित नसतानाही त्यांनी ती पदवी आपल्या नावापुढे लावणे अयोग्य आहे. यामुळे रुग्णांची फसवणूक होते. डॉक्टरांनी अशाप्रकारे पदव्या नावापुढे लावल्या असतील तर त्यांनी त्या काढून टाकाव्यात, असे आवाहन परिषदेने पत्राद्वारे केले आहे.