खोटी शैक्षणिक माहिती देणाऱ्या लोणीकरांचा राजीनामा घ्या : काँग्रेस

0
7

मुंबई दि.११:: दिल्लीत बोगस पदवीच्या आरोपांवरुन माजी कायदा मंत्री जितेंद्र सिंह तोमर अटकेत असताना, महाराष्ट्रात पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांच्या पदवीवरुन वाद निर्माण झाला आहे. विविध निवडणुकांच्या प्रतिज्ञापत्रात खोटी माहिती सादर करणाऱ्या बबनराव लोणीकरांवर तोमर यांच्याप्रमाणेच कारवाई करा, अशी मागणी काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.
मराठवाड्याचे परतूर भाजप आमदार बबनराव लोणीकर सध्या राज्याचे पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री आहेत.
काँग्रेसच्या आरोपांनुसार लोणीकरांनी 2004, 2009 आणि 2014 या वर्षाच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात विसंगत माहिती दिली आहे. 2004 आणि 2009 च्या निवडणुकीत लोणीकरांनी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून बीए प्रथम वर्ष उत्तीर्ण असल्याचं म्हटलं आहे. तर 2014 च्या निवडणुकीत बबनरावांनी पाचवी उत्तीर्ण असल्याचं नमूद केलं आहे.मात्र, बबनराव लोणीकर यांनी हे सर्व आरोप फेटाळले आहेत.
दिल्लीचे कायदा मंत्री जितेंद्र सिंह तोमर यांच्यावरील कारवाईचे भाजपने समर्थन केलं आहे. भाजपचे मंत्री लोणीकर यांनी तीन निवडणुकांमध्ये खोटी शैक्षणिक माहिती सादर केली आहे. त्यामुळे आता भाजप लोणीकर यांच्याविरोधात कोणती कारवाई करणार, असा सवाल काँग्रेसने केला आहे.