महाराष्ट्र सदन गैरव्यवहार तिघे अभियंते निलंबित

0
15

मुंबई दि. १३ – दिल्लीतील नवीन महाराष्ट्र सदन उभारणीत अनियमितता आणि भ्रष्टाचार केल्याचा ठपका ठेवून आज सार्वजनिक बांधकाम विभागाने तीन अधिकाऱ्यांना निलंबित केल्याचे समजते. यातील एक अधिकारी भारतीय जनता पक्षाच्या खासदाराचा भाऊ असल्याचे समजते.

नव्या महाराष्ट्र सदनातील गैरव्यवहाराबद्दल लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ आणि त्यांचे चिरंजीव पंकज आणि पुतण्या समीर यांच्यासह 17 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. तत्कालीन मुख्यमंत्री व मुख्य सचिवांच्या हरकती डावलून, तसेच निविदा न मागविता जवळच्या व्यक्तीला कंत्राट दिल्याचा आरोप भुजबळांवर ठेवण्यात आला आहे. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी मुख्य अधीक्षक अभियंता अनिल गायकवाड, अधीक्षक अभियंता संजय सोळंकी आणि मुख्य वास्तुविशारद बिपिन संख्ये यांना निलंबित करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
नवी दिल्ली येथील नवीन महाराष्ट्र सदन, अंधेरी आरटीओ व अतिथिगृहाच्या बांधकामासह अकरा वेगवेगळ्या प्रकरणांत तपास करणाऱ्या एसआयटीने आतापर्यंत माजी मंत्री छगन भुजबळ, सार्वजनिक बांधकाम विभागातील तत्कालीन अधिकारी, भुजबळ यांच्या कुटुंबातील सदस्य आणि विकसक यांच्याविरुद्ध दोन गुन्हे दाखल केले आहेत. महाराष्ट्र सदन, अंधेरी येथील आरटीओ कार्यालय तसेच हायमाउंट अतिथिगृहाचे काम कोणतीही निविदा न काढता के. एस. चमणकर यांना दिले. हे काम घेतलेल्या विकसकाने त्याचे सबकॉन्ट्रॅक्‍ट दुसऱ्याला देऊ नये असे स्पष्ट असतानासुद्धा चमणकर यांनी एल ऍण्ड टी एशियन रिऍलिटी प्रोजेक्‍ट या कंपनीला सब कॉन्ट्रॅक्‍ट दिले. प्रत्यक्षात कोणतेही काम न करता चमणकर यांनी या कंपनीकडून मधल्यामधे 550 कोटी रुपये उचलल्याचा आरोप “एसीबी‘ने केला आहे.

याच्या मोबदल्यात मे. के. एस. चमणकर एंटरप्रायजेसशी निगडित कंपन्यांकडून भुजबळ यांचे कुटुंबीय संचालक असलेल्या कंपन्यांत कोट्यवधी रुपये आले. याशिवाय भुजबळ, त्यांचे पुतणे समीर, तन्वीर शेख, इरम शेख, संजय जोशी, गीता जोशी यांनी ते संचालक असलेल्या कंपन्यांच्या माध्यमातून अशा कंपन्यांच्या बॅंक खात्यांतसुद्धा भुजबळ यांच्यासाठीच या रकमा घेतल्याचे एसआयटीने दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे.