पुणे येथे सोमवारपासून विभागीय आयुक्त, जिल्हाधिकाऱ्यांची दोन दिवसीय राजस्व परिषद

0
12

मुंबई दि. १४: राज्यातील महसूल विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची दोन दिवसीय राजस्व परिषद सोमवार दिनांक 15 जूनपासून सुरू होणार आहे. गेल्या सहा महिन्यांपासून घेतलेल्या विविध निर्णयांमुळे सामान्यांना महसूल विभागामार्फत गतिमान प्रशासनाचा अनुभव देतानाच भविष्यातील नव्या योजनांना आकार देणारी ही परिषद असेल असे, महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी सांगितले.

श्री. राठोड म्हणाले, यशदाच्या एमडीसी सभागृहात होणाऱ्या या परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री एकनाथराव खडसे, राज्यमंत्री संजय राठोड मार्गदर्शन करणार आहेत. राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, जमाबंदी आयुक्त, नोंदणी महानिरीक्षक, सर्व जिल्हाधिकारी, अप्पर आयुक्त, नोंदणी उपमहानिरीक्षक, अतिरिक्त जिल्हाधिकारी सहभागी होणार आहेत.

महसूल विभागाचा आढावा घेऊन भविष्यातील वाटचालीचे नियोजनावर दोन दिवसीय परिषदेत चर्चा होणार आहे. राज्याचा महत्वाकांक्षी प्रकल्प असलेला जलयुक्त शिवार योजना यशस्वीरित्या राबविण्यासाठी जिल्हा प्रशासनाचा मोठ्या प्रमाणावर सहभाग असल्याने ह्या परिषदेत या योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीवर चर्चा करण्यात येणार आहे. त्याचबरोबर शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांवर देखील मंथन होणार आहे. महसूल विभागाशी सामान्य माणसांचा नेहमीच संपर्क येत असतो. त्यामुळे या विभागाच्या माध्यमातून सर्व सामान्यांना पारदर्शक, गतिमान प्रशासनाचा अनुभव देण्यासाठी अजून कुठले नवीन उपक्रम, योजना राबविल्या पाहिजेत, यावरही विचारविनिमय होणार असल्याचे श्री. राठोड यांनी सांगितले.