३५ वर्षात १५ हजारांवर लोकांचा मृत्यू

0
4

वृत्तसंस्था
नवी दिल्ली,दि. १४-वाढत्या नक्षलवादामुळे देशाची अंतर्गत सुरक्षा धोक्यात आली असल्याचेच चित्र माहिती अधिकार कायद्यांतर्गत एका प्रश्‍नाला मिळालेल्या उत्तरातून स्पष्ट झाले आहे. गेल्या ३५ वर्षांच्या काळात देशाच्या विविध भागांमध्ये नक्षली हिंसाचारात १५ हजारांपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला असून, यात तीन हजारांवर सुरक्षा जवानांचा समावेश आहे.
एका आरटीआय कार्यकर्त्याने नक्षली हिंसाचार आणि त्यात आतापर्यंत गेलेले बळी याबाबत विचारलेल्या प्रश्‍नाला उत्तर देताना केंद्रीय गृह मंत्रालयाने ही धक्कादायक माहिती सादर केली. मागील ३५ वर्षांत नक्षलवाद्यांच्या विविध हिंसाचारात १२,१७७ नागरिकांचा मृत्यू झाला आणि नक्षलविरोधी मोहिमेच्या काळात झडलेल्या अनेक चकमकींमध्ये सुरक्षा दलांच्या ३१२५ जवानांना आपला जीव गमवावा लागला, असे गृहमंत्रालयाने दिलेल्या उत्तरात नमूद आहे.
१९८० ते ३१ मे २०१५ या काळातील माहिती गृहमंत्रालयाने सादर केली आहे. या काळात सुरक्षा जवानांनी ४७६८ नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले आहे. नक्षल्यांजवळ अत्याधुनिक शस्त्रे पोहोचली असल्याने ते अधिक घातक हल्ले करू लागले आहेत. त्यांचा समर्थपणे मुकाबला करणे शक्य व्हावे, यासाठी पोलिस दलाच्या आधुनिकीकरणावर सरकारने भर दिला आणि आधुनिकीकरणाची योजना गतीने राबविण्यासाठी नक्षलप्रभावित राज्यांना गेल्या तीन वर्षांच्या काळात ३ हजार ३८ कोटी रुपयांचा निधी देण्यात आला असल्याची माहितीदेखील यावेळी गृहमंत्रालयाने दिली.
२०१२-१३ आणि २०१४-१५ या आर्थिक वर्षात आंध्रप्रदेशला पोलिस दलाचे आधुनिकीकरण करण्यासाठी १६१ कोटींचा निधी देण्यात आला, तर उत्तरप्रदेशला ३७७ कोटी रुपये, तसेच छत्तीसगड आणि झारखंड या राज्यांना अनुक्रमे ७३ कोटी आणि ६९ कोटींचा निधी देण्यात आला, असेही गृहमंत्रालयाच्या उत्तरात नमूद आहे.