विडी कामगारांना सुधारित दराने वेतन देण्याबाबत कारखानदारांनी सकारात्मक कार्यवाही करावी- विजय देशमुख

0
16

मुंबई दि. १५-: विडी कामगारांना शासन अधिसुचनेप्रमाणे सुधारित दराने वेतन देण्याबाबत विडी कारखानदारांनी सकारात्मक कार्यवाही करावी, असे आवाहन कामगार राज्यमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय देशमुख यांनी विडी कारखानदारांना केले.

विडी कामगारांच्या वेतनप्रश्नी सोमवारी मंत्रालयात बैठक झाली, त्यावेळी श्री. देशमुख बोलत होते. यावेळी कामगार आयुक्त एच. के. जावळे, कामगार नेते माजी आमदार नरसय्या आडम, विडी कारखाना मालक प्रतिनिधी सुधीर साबळे, डॉ. जवाहरभाई शहा, कामगार प्रतिनिधी पद्माताई म्हंता, विष्णु कारमपुरी, विठ्ठल कदम, विठ्ठल कुराडकर, उमेश विश्वाद, वरलक्ष्मी गोल्लू आदी उपस्थित होते.

श्री. देशमुख म्हणाले, विडी कामगारांना न्याय देण्याच्या उद्देशाने शासनाने अधिसूचना काढून त्यांच्यासाठी किमान वेतन निश्चित केले आहे. पण एकीकडे विडी कारखानदार या अधिसूचनेची अंमलबजावणी करीत नाहीत, अशा कामगारांच्या तक्रारी आहेत, तर दुसरीकडे इतकी वेतनवाढ देणे शक्य नसल्याचे विडी कारखानदारांचे म्हणणे आहे. या पार्श्वभूमीवर कारखानाही चालू राहिला पाहिजे आणि कामगारही त्याच्या वेतनातून चांगल्या पद्धतीचे जीवन जगला पाहिजे या दोन्ही गोष्टी होणे आवश्यक आहेत. कामगार आणि मालक प्रतिनिधींनी यासाठी समन्वयाने मार्ग काढावा. वाढती महागाई, मुलांचे शिक्षण आदी पार्श्वभूमीवर विडी कामगारांची अवस्था पाहता त्यांना शासन अधिसूचनेनुसार सुधारित दराने वेतन देणे गरजेचे आहे. विडी कारखाना मालकांनी यादृष्टीने सकारात्मक विचार करुन वेतनवाढीबाबत कार्यवाही करावी, असे आवाहन त्यांनी केले.

याप्रसंगी विडी कामगारांनी इलेक्ट्रॉनिक्स वजन काट्यांचा वापर करणे, गुलकट्टा बंद करणे यासह कामगारांचे शोषण होणार नाही, त्यांच्या वेतनात कपात होणार नाही, यादृष्टीने धोरण आखण्यासंदर्भात मागण्या केल्या. यासंदर्भात विडी कामगार, कारखाना मालक आणि शासन प्रतिनिधी यांची त्रिस्तरीय समिती नेमून विडी कामगारांचे शोषण होणार नाही, यादृष्टीने या समितीने कामकाज करावे, असे राज्यमंत्री श्री. देशमुख यांनी सांगितले. अशी त्रिस्तरीय समिती तातडीने नेमण्याचा निर्णय याप्रसंगी घेण्यात आला.