छगन भुजबळांच्या कार्यालयावर ACBचे छापे

0
6

नाशिक, दि. १६ – राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्यावर अँटी करप्शन ब्युरोची वक्रदृष्टी वळली असून भुजबळ यांच्या एमईटी या संस्थेच्या नाशिक व मुंबईतील कार्यालयांवर आज सकाळी एकाचवेळी छापे टाकण्यात आल्याचे वृत्त आहे. महाराष्ट्र सदनच्या कामामध्ये गैरव्यवहार झाल्याचा आरोप करण्यात आला होता, या प्रकरणी एकूण १७ जणांवर छापे टाकण्यात आले होते त्याच मालिकेत आता भुजबळ यांची भर पडली आहे.
भुजबळांच्या वरळी, दादर, भायखळा, दक्षिण मुंबई, नाशिक अशा अनेक ठिकाणच्या भुजबळांच्या घरांवर व कार्यालयांवर एकाचवेळी कारवाई करण्यात आली असून भाजपाचे खासदार किरीट सोमय्या यांच्या सांगण्यानुसार ही तर सुरुवात आहे. भुजबळांच्या याखेरीज आणखी अनेक मालमत्ता देशविदेशात असून त्यांची सगळी मालमत्ता बाहेर येईल.
तर, एका कार्यक्रमात बोलताना छगन भुजबळ यांनी मलाच नाही तर माझ्या संपूर्ण कुटुंबाला गाडण्यासाठी द्वेषबुद्धीने केल्याची टीका केली आहे.
खोटा अहवाल ठेवणे, मर्जीच्या कंत्राटदाराला काम देणे, सरकारची दिशाभूल करणे, खोटे हिशेब दाखवणे, कंत्राटे देण्यासाठी पैसे स्वीकारणे असे अनेक आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आले आहेत. काही अधिका-यांवर बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी लाचचुचपत प्रतिबंधक विभाग कारवाई करण्यात आली असून आता भुजबळही अडचणीत सापडले आहेत.
राष्ट्रवादीही भाजपाचा अंतर्गत मित्रपक्ष असून राष्ट्रवादीच्या नेत्यांवर कारवाई होणार नाही अशी अटकळ बांधली जात होती, परंतु त्याला छेद देत राष्ट्रवादीच्या नमेत्यांवर कारवाई करण्यात येत असल्याचे दिसत आहे. दरम्यान, कायद्याने व्यवसाय करून मालमत्ता कमवायला केवळ अंबानी अडानींना परवानगी नाही तर ती प्रत्येकाला आहे, त्यामुळे भुजबळांनी वैध मार्गाने संपत्ती कमावली असेल तर त्यात गैर काय असा प्रश्न राष्ट्रवादीचे नेते नबाब मलिक यांनी विचारला आहे. तसेच, भुजबळांना मुद्दामून गोवण्यात आले असून राष्ट्रवादी भुजबळांच्या ठामपणे पाठिशी असल्याचे मलिक म्हणाले.