द्वेष बुद्धीने कारवाई करणार नाही – मुख्यमंत्री

0
10

वृत्तसंस्था
मुंबई दि. १६,- राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते छगन भुजबळ यांच्याविरूद्ध लाचलुचपत विभागाने गुन्हा दाखल केल्यामुळे शोध घ्यावा लागत आहे, ही प्रक्रिया असून कुणाबद्दल आकस अथवा द्वेष बुद्धीने कारवाई करणार नसल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे.

मुख्यमंत्री फडणवीस आज (मंगळवार) पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या निर्णयाबाबतही माहिती दिली. त्यामध्ये 10 लाख लोकांना रोजगार, 50 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक, ग्रामीण भागात बिझनेस प्रोसेसिंग आऊटसोर्सिंग झाले तर सरकार 25 लाख रुपयांचे अनुदान, ऍनिमेशन चित्रपट राज्यात निर्माण झाला तर करमणूक करात सवलत देण्यात येईल असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. तसेच सरकारने वडसा-देसाईगंज-गडचिरोली मार्गासाठीच्या 469 कोटीच्या अंदाजपत्रकाला मान्यता दिली असून पुढील 5 वर्षांत हा मार्ग पूर्ण होण्याची शक्‍यता असून वर्धा-यवतमाळ-नांदेड मार्गावर लवकरच मान्यता देण्यात येणार असल्याचेही पुढे सांगितले. सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये यासाठी कायदा करणार असल्याचेही ते पुढे म्हणाले. यासाठी महाराष्ट्र आरोग्य रक्षण व थुंकी प्रतिबंधक कायदा करण्यासाठी आरोग्यमंत्री, शिक्षण मंत्री, पाणीपुरवठा मंत्री यांचा सहभाग असलेली समिती स्थापन करणार असून ही समिती पावसाळी अधिवेशनापूर्वी अहवाल देईल असेही त्यांनी सांगितले. मेट्रो तीन प्रकल्पाला विरोध नसून तो रद्द करण्याचा सरकारचा विचार नसल्याचे ते म्हणाले. तसेच पुनर्वसनासाठीच्या पर्यायी जागेवरही विचार करण्यात येणार असल्याचे ते पुढे म्हणाले.