महाराष्ट्रातील अधिकाधिक गावे आदर्श बनतील- चौधरी वीरेंद्र सिंह

0
11

मुंबई दि.७: सांसद आदर्श ग्राम योजनेच्या आतापर्यंतच्या वाटचालीत महाराष्ट्राने चांगली आघाडी घेतली असून राज्यातील सर्व खासदारांनी या योजनेसाठी गावांची निवड केली आहे. या गावांचा ग्रामविकास आराखडा केंद्राला प्राप्त झाला असून केंद्र शासन, राज्य शासन, लोकप्रतिनिधींचा पुढाकार आणि लोकांचा सहभाग यातून ही गावे ऑक्टोबर २०१६ पर्यंत आदर्श बनविण्यात येतील, असे केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री चौधरी वीरेंद्र सिंह यांनी सांगितले.
महाराष्ट्र शासनाने सुरु केलेली आमदार आदर्श ग्राम योजनाही कौतुकास्पद असून या दोन्ही योजनांमधून महाराष्ट्रातील जास्तीत जास्त गावे आदर्श ग्राम बनतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
मंत्री श्री. सिंह यांच्या प्रमुख उपस्थितीत येथील सह्याद्री राज्य अतिथीगृहात मंगळवारी या योजनेच्या महाराष्ट्र आणि गोवा राज्यातील आढाव्यासाठी खासदार आणि जिल्हाधिकाऱ्यांची बैठक झाली. यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत श्री. सिंह यांनी ही माहिती दिली. आढावा बैठकीला केंद्रिय अवजड उद्योग मंत्री अनंत गीते, केंद्रिय रसायन व उर्वरक राज्यमंत्री हंसराज अहीर, राज्याचे महसूल मंत्री एकनाथराव खडसे, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, ग्रामविकास राज्यमंत्री दीपक केसरकर, केंद्रिय ग्रामीण विकास विभागाच्या सहसचिव श्रीमती अपराजिता सारंगी, राज्याच्या ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव व्ही. गिरीराज यांच्यासह राज्यातील खासदार, जिल्हाधिकारी, वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
श्री. सिंह म्हणाले, पंतप्रधानांच्या संकल्पनेस अनुसरुन कार्यान्वित झालेली ही योजना केंद्र शासन एक फ्लॅगशीप प्रोग्राम म्हणून राबवित आहे. या योजनेतून देशभरात २०२४ पर्यंत साधारण ५ हजार ५०० आदर्श ग्रामे उभारण्याचा शासनाचा मानस आहे. या योजनेतून प्रेरित होऊन देशभरातील १० राज्यांनीही त्यांच्या स्तरावर आदर्श ग्राम योजना सुरु केल्या आहेत. सांसद आदर्श ग्राम योजनेसाठी सामाजिक उत्तरदायित्व निधीतून मदत करण्यासाठी विविध कॉर्पोरेट कंपन्याही तयार झाल्या आहेत. अशा विविध घटकांच्या सहभागातून देशभरात ठिकठिकाणी आदर्श गावे उभी केली जातील, असे ते म्हणाले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आंबावडे हे गाव तसेच पंजाब येथील शहीद भगतसिंग यांच्या गावाची सांसद आदर्श ग्राम योजनेसाठी निवड करण्यात आली असल्याचे श्री. सिंह यांनी जाहीर केले. सांसद आदर्श ग्राम योजनेसाठी काही निकष निश्चित करण्यात आले आहेत. ही गावे या निकषात बसत नव्हती. खासदारांच्या सुचनेनुसार या गावांची निवड करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
मंत्री श्री. गीते म्हणाले, कंपन्यांकडून सामाजिक उत्तरदायित्व निधीतून सांसद आदर्श ग्राम योजनेसाठी जास्तीत जास्त मदत उपलब्ध होण्याबाबत आपण त्यांना आवाहन करु. केंद्र तसेच राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ या गावांना मिळणार आहे. महाराष्ट्रात विविध योजनांमधून जास्तीत जास्त आदर्श गावे उभी राहतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
श्री. अहीर म्हणाले, महाराष्ट्र शासनामार्फत राबविण्यात येत असलेली जलयुक्त शिवार योजना ही अत्यंत आदर्श अशी योजना आहे. सांसद आदर्श ग्राम योजनेतील सर्व गावांना रस्ते जोडणी आणि बँक शाखा देण्यात यावी, अशी सूचना त्यांनी केली.
श्री. खडसे म्हणाले, आदर्श ग्राममध्ये फक्त पायाभूत सुविधांची उभारणी न करता त्याच्याबरोबरीनेच तंटामुक्ती, नशाबंदी, संपूर्ण साक्षरता, बालविवाह प्रतिबंध, लोकांचा पुढाकार अशा विविध सामाजिक विकासाच्या बाबींचाही अवलंब करण्यात यावा. पायाभूत विकास आणि सामाजिक विकास या दोहोंच्या अंमलबजावणीतूनच खऱ्या अर्थाने आदर्श गावे उभी राहतील, असे ते म्हणाले.
श्रीमती मुंडे म्हणाल्या, सांसद आदर्श ग्राम योजनेची राज्यात चांगली अंमलबजावणी होत आहे. त्याच धर्तीवर राज्याच्या ग्रामविकास विभागामार्फत आखण्यात आलेल्या आमदार आदर्श ग्राम योजनेचीही राज्यात प्रभावी अंमलबजावणी केली जाईल. या दोन्ही योजना यशस्वी करण्यासाठी विविध घटकांचा सहभाग घेतला जाईल. केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजना आदर्श गावांमध्ये फास्ट ट्रॅक पद्धतीने राबविल्या जातील, असेही त्या म्हणाल्या.
श्री. केसरकर म्हणाले, सांसद आदर्श ग्राम योजनेतून निवड झालेल्या गावांसाठी जिल्हा विकास योजनेतूनही निधी उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न केला जाईल.याप्रसंगी उपस्थित खासदारांनी योजनेच्या अंमलबजावणीसंदर्भात विविध सूचना केल्या. केंद्रीय सहसचिव श्रीमती सारंगी यांनी योजनेच्या अंमलबजावणीसंदर्भात सविस्तर माहिती दिली. तसेच जिल्हाधिकाऱ्यांनी योजनेच्या प्रगतीचे सादरीकरण केले.