विश्‍व मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदी शेषराव मोरे

0
15

पुणे, दि.१० -पोर्ट ब्लेअर येथे होणार्‍या चौथ्या अखिल भारतीय विश्‍व मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी स्वा. सावरकर यांच्या कारकीर्दीवर व वाडमयावर गेली चाळीस वर्षे संशोधन व लेखन करणारे ज्येष्ठ साहित्यिक शेषराव मोरे यांची निवड करण्यात आली आहे. साहित्य मंडळाच्या अध्यक्ष डॉ. माधवी वैद्य यांनी शुक्रवारी येथे पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
येत्या ५ आणि ६ सप्टेंबर रोजी अंदमानातील पोर्ट ब्लेअर येथे हे विश्‍व संमेलन होणार आहे. निसर्ग कवी ना. धों. महानोर यांनी अध्यक्षपद स्वीकारण्यास नकार दिल्यानंतर शेषराव मोरे यांची संमेलनाध्यक्षपदी निवड करण्यात आली.
शेषराव मोरे यांनी आतापर्यंत ‘सावरकरांच्या समाजक्रांतीचे अंतरंग’, ‘कॉंग्रेस आणि गांधींजींनी अखंड भारत का नाकारला?’, ‘सावरकरांचा बुद्धिवाद आणि हिंदुत्ववाद’, यासारखी अनेक पुस्तके लिहिली आहेत. शिवाय ‘शोध मुस्लिम मनाचा’ हे शेषराव मोरे यांचे पुस्तक चर्चेत राहिले.
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर स्मृती सुवर्णमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधून सप्टेंबर महिन्यात अंदमान येथे विश्‍व साहित्य संमेलन भरवण्यात येणार आहे. यापूर्वी सॅनहोजे, सिंगापूर आणि दुबई येथे विश्‍वसंमेलन झाले आहे.