वस्त्रोद्योग महामंडळाच्या अध्यक्षपदी रविकांत तुपकर यांची निवड

0
15

मुंबई दि.१0: -स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांची महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महामंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. शुक्रवार, १० जुलै रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची या पदासाठी निवड केली. यापूर्वी त्यांची यंत्रमाग महामंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती. ही नियुक्ती रिक्त होऊन तीन दिवसातच तुपकरांना वस्त्रोद्योग महामंडळाच्या अध्यक्षपदाची नव्याने जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
मुख्यमंत्र्यांच्या आदेशान्वये सहकार मंत्री चंद्रकांतदादा पाटील, सदाभाऊ खोत, लक्ष्मणराव वडले, आ. चैनसुख संचेती यांच्या उपस्थितीत पदभार तुपकर यांनी पदभार स्वीकारला.तुपकरांना पूर्वी वस्त्रोद्योग महामंडळाच्या अंतर्गत येत असलेल्या यंत्रमाग महामंडळाचे अध्यक्षपद देण्यात आले होते. या मंडळाचे माजी अध्यक्ष चंद्रकांत दायमा यांनी या संदर्भात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. सरकार बदलल्यानंतर केवळ राजकीय हेतूने यंत्रमाग मंडळाच्या अध्यक्षपदावरून आपली उचलबांगडी करण्यात आली तसेच पदावरून काढताना कायदेशीर बाबींचे पालन करण्यात आले नाही, असा युक्तिवाद दायमा यांनी केला होता. या प्रकरणात दायमा यांची केलेली बडतर्फी कायद्याशी विसगंत होती. मात्र तुपकारांची नियुक्ती बेकायदेशीर असल्याचे कुठेच म्हटलेले नव्हते. या प्रकारामुळे स्वाभिमानीचे कार्यकर्ते निराश झाले होते.
आता त्यांच्याकडे वस्त्रोद्योग महामंडळाची जबाबदारी सोपविण्यात आली असून या महामंडळाचे कार्यक्षेत्र राज्यव्यापी आहे. या महामंडळाच्या माध्यमातून भरीव कामगिरी करता येणार आहे. विदर्भात कापसावर प्रक्रिया उद्योग निर्माण करण्यासह विदर्भ आणि बुलढाणा जिल्ह्यात देखील टेक्सटाईल पार्क आणि एखादा मोठा उद्योग उभारता येऊ शकतो, असे रविकांत तुपकर यांनी सांगितले.