शिरपूरला सात प्राचीन जैन मूर्ती सापडल्या

0
16

वाशीम दि. १२-जिल्ह्यातील शिरपूर जैन येथील प्रसिद्ध जैन मंदिरात आज रविवारी सात प्राचीन मूर्ती सापडल्या असून, त्या बघण्यासाठी आजूबाजूच्या परिसरातील जैनबांधवांनी दर्शनासाठी एकच गर्दी केली.
रविवार, १२ जुलै रोजी नित्यनियमाप्रमाणे येथील जैन मंदिरामध्ये पोलिस बंदोबस्तात दिगंबरी पुजारी ब्र. अजयभैया व श्‍वेतांबरी पुजारी आत गेले असता पार्श्‍वनाथ भगवंताच्या मूर्तीजवळ अंदाजे ८ फूट लांबीचा काळ्या रंगाचा नाग त्यांच्या निदर्शनास आला. तो मूर्ती जवळून पुढे जात असता हा नाग कुठे जात आहे हे पाहण्यासाठी पुजारी व पोलिस कॉन्स्टेबल उजेड घेऊन मागे गेले असता, तो ज्या कोपर्‍यात गेला तेथे एक छोटी कपार आढळली व त्या कपारीमध्ये ब्र. अजयभैया गेले असता तेथे दिव्याच्या उजेडात प्राचीन दिगंबरी खड्डागासनस्थ (उभ्या आसनातल्या) काळ्या पाषाणाच्या अंदाजे अडीत ते तीन फूट उंचीच्या चार मूर्ती तर सापडल्याच, शिवाय पंचमेरूच्या तीन धातूच्या मूर्तींसह पंचवालयती (वासुपूज्य, पार्श्‍वनाथ, नेमिनाथ, मल्लीनाथ, महावीर) एक मूर्ती अशा एकूण सात दिगंबरी मूर्ती सापडल्या. यामध्ये भगवान महावीर, भगवान पार्श्‍वनाथ व पद्मावती देवीच्या मूर्तीचा समावेश आहे.
ह्या सर्व मूर्ती अतिशय प्राचीन असून, सर्व दिगंबर पंथीय आहेत. सदर मूर्ती सापडल्यानंतर गावासह आजूबाजूच्या गावांतील सर्व जैनबांधव दर्शन घेण्यासाठी शिरपूर येथे आले.
परंतु, सापडलेल्या या नवीन मूर्ती आतील तळघरातील गाभार्‍यामध्ये असल्यामुळे, तसेच दिगंबर व श्‍वेतांबर यांच्यातील वादामुळे परिस्थिती ‘जैसे थे’ ठेवण्याच्या कोर्टाच्या आदेशामुळे कोणालाही त्या मूर्तीचे दर्शन झाले नाही.
मंदिराचा वाद लवकर सुटावा याकरिता समाजातील सर्व मुनी महाराज, माताजी, श्रावक, अनुष्ठान विधान नियमितपणे करत आहेत. प्राचीन मूर्ती सापडल्याची बातमी संपूर्ण भारतभर पसरली असून, या सर्व मूर्ती दिगंबरी असल्याने त्या दर्शनासाठी ताब्यात द्याव्या, अशी मागणी समाजामध्ये होत आहे. दर्शनापासून कुठल्याही समाजाला वंचित ठेवू नये, या कायद्याचा आधार घेऊनच सर्व समाज ही मागणी करीत आहे.