कर्जमाफीवरून अधिवेशनाच्या दुस-या दिवशीही आंदोलन

0
11

मुंबई दि. १४- विरोधकांनी शेतक-यांना कर्जमाफी देण्यावरून पावसाळी अधिवेशनाच्या दुस-या दिवशीही जोरदार आंदोलन केले. शेतक-यांना कर्जमाफी दिल्याशिवाय अधिवेशनाचे कामकाज चालू देणार नाही. तत्काळ शेतक-यांच्या प्रश्नांवर व कर्जावर आज विधीमंडळात चर्चा घडवून आणावी अशी मागणी करीत काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आमदारांनी विधानभवनाच्या पाय-यावर घोषणाबाजी करीत जोरदार आंदोलन केले. त्यानंतर विधानसभेतील वेलमध्ये उतरून विरोधक आमदारांनी गदारोळ केला. विरोधकांच्या गदारोळातच प्रश्नोत्तराच्या तासाला सुरुवात झाली.

विधानभवनाबाहेर सरकारविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी घोषणा दिल्या. तसेच ‘उद्धव हमारे साथ है, ये अंदरकी बात है’ अशा घोषणा दिल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

शेतक-यांच्या कर्जमाफीबाबत सरकार चर्चा करायला तयार आहे. विरोधकांनी याचे राजकारण करू नये. विरोधी आमदार हसत-खेळत आंदोलन करीत असल्यामुळे त्यांना खरोखरच शेतक-यांचा कळवळा आहे का? असा सवाल कृषीमंत्री एकनाथ खडसे यांनी विरोधकांना केला आहे.

विधीमंडळाचे आज सकाळी ११ वाजता कामकाज सुरु होताच विरोधक आमदारांनी शेतक-यांच्या कर्जमाफीचा मुद्दा उपस्थित पाय-यांवरच आंदोलन सुरु केले. त्यावेळी फडणवीस सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आल्या. भाजपा-शिवसेना सरकारकडे जनतेच्या कल्याणासाठी कोणतेही ठोस धोरण नाही. भ्रष्टाचार, बोगस पदवी प्रकरणे आणि परस्परांतील वादांत हे सरकार अडकले असून या सरकारची सध्याची अवस्था नाचता येईना, अंगण वाकडे, अशी झाली आहे, अशी टीका विरोधकांनी केली.