दारूबंदी जिल्ह्याकरिता विशेष मोहीम राबविणार- मुख्यमंत्री

0
13

मुंबई दि. २३: चंद्रपूर जिल्ह्यात नुकतीच दारूबंदी करण्यात आली असून गडचिरोली व वर्धा जिल्ह्यात यापूर्वीच दारूबंदी करण्यात आली आहे. या दारूबंदी जिल्ह्यात लगतच्या जिल्ह्यातून रात्रीच्या वेळी अवैधरित्या दारूचा व्यवसाय होत असल्याने या जिल्ह्यात दारूबंदीसाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरूवारी विधानपरिषदेत दिली.

यवतमाळ जिल्ह्यातील यावली येथे दारूबंदीसाठी आग्रह धरणाऱ्या पोलीस पाटील यांच्या हत्येप्रकरणी विधानपरिषद सदस्य संदीप बाजोरिया, डॉ. नीलम गोऱ्हे, प्रा.जोगेंद्र कवाडे यांनी प्रश्न उपस्थित केला होता, त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. ते म्हणाले, राज्यातील पोलीस पाटलांच्या संरक्षणाची जबाबदारी राज्य शासनाची आहे. त्यामुळे पोलीस पाटील विरेंद्र राठोड यांच्या हत्येप्रकरणी संशयितांना अटक करण्यात आली आहे. राज्याचे दारूबंदीबाबतचे धोरण हे प्रतिबंधात्मक असून त्याचे नियमन होण्यासाठी अन्य जिल्ह्यात परवाने देण्यात आले आहेत. तथापि, संपूर्ण महाराष्ट्रात दारूबंदी करावयाची असल्यास त्याबाबत आढावा घेणे आवश्यक असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.

यावेळी एका उपप्रश्नाला उत्तर देताना उत्पादन शुल्क मंत्री एकनाथराव खडसे म्हणाले, दारूबंदीसंदर्भात गावकऱ्यांच्या वेगवेगळ्या मागण्या आहेत. ग्रामसभेत ठराव केल्यानंतर दारू विक्रेत्यांचे परवाने रद्द करण्याचा शासन प्रयत्न करणार आहे. मात्र त्या भागातील मागणी करणाऱ्या स्त्रियांचे प्रमाण किमान 50 टक्के असणे आवश्यक असून त्या स्त्रियांची नावे त्या मतदारयादीत समाविष्ट असणे गरजेचे आहे.