देवरी येथे 110 कोटी गुंतवणूकीचा प्रोसेसिंग युनिट

0
6

१ हजार ८०९ कोटी रुपये गुंतवणुकीच्या
उद्योगांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ऑफर लेटर
ङ्घ उमरेड व देवरी येथे नवीन उद्योग सुरु होणार

नागपूर, दि. २१ : विदर्भात उद्योग विकासाला प्रोत्साहन देण्याच्या धोरणाच्या अनुषंगाने उद्योग सुरु करण्यासाठी सकारात्मक भूमिका घेतल्यामुळे उमरेड येथील औद्योगिक क्षेत्रात १ हजार ६९९ कोटी रुपये गुंतवणूक असलेल्या ॲल्युमिनियम इंजिनियर पे युनिट तसेच गोंदिया जिल्हयातील देवरी येथील औद्योगिक क्षेत्रात रुद्रा फॉर्म्स आणि प्रोसेसिंग प्रायव्हेट लि. या उद्योग समूहाकडून तांदळावर प्रकिया करुन स्वीटनर आणि प्रोटीन तयार करण्याचा उद्योग सुरु होत आहे.
हॉटेल सेंटर पाँईट येथे आयोजित प्लॅस्टीक आणि केमिकल उद्योगा संदर्भातील सेमिनारच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १ हजार ६९९ कोटी रुपये गुंतवणूक असलेल्या गुजरात फॉयील लि. या उद्योग समूहाचे सुरेंद्र लोढा यांना औद्योगिक क्षेत्रात उद्योग सुरु करण्यासदंर्भातील ऑफर लेटर दिले. तसेच धान उत्पादक क्षेत्रात तांदळापासून स्वीटनर व प्रोटीन युनिट तयार करण्याचा रुद्रा फार्म ॲन्ड प्रोसेसिंग युनिटचे संजय सिंग यांनाही उद्योग सुरु करण्यासदंर्भातील ऑफर लेटर दिले. तसेच दोन्ही उद्योजकांचे विदर्भात उद्योग सुरु केल्याबद्दल पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
यावेळी केंद्रीय भूतल परिवहन मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय रसायने राज्य मंत्री हंसराज अहीर ,उर्जा मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आदिवासी विकास राज्यमंत्री राजे अम्ब्रीशराव आत्राम, खासदार अजय संचेती, खासदार कृपाल तुमाने, सर्वश्री आमदार नाना शामकुळे, आशिष देशमुख, समीर मेघे, तसेच विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते.
भंडारा व गोंदिया जिल्हयातील धान उत्पादक क्षेत्रामध्ये धानावर प्रकिया करुन त्यापासून स्वीटनर व प्रोटीन तयार करण्याचा उद्योग प्रथमच सुरु होत असून या उद्योगासाठी देवरी औद्योगिक क्षेत्रात ७५ हजार चौरस मिटर जागा उपलब्ध करुन देण्यात आले असून या उद्योगामध्ये १०० ते १२० बेरोजगार युवकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. रुद्रा फार्म ॲन्ड प्रोसेसिंग या उद्योग समूहाकडून ११० कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असल्याची या उद्योजगाचा टप्प्या टप्प्याने विस्तार करणार असल्याची माहिती संजय सिंग यांनी दिली.
उमरेड औद्योगिक क्षेत्रात गुजरात फाईल लि. या उद्योग समूहाने १ लक्ष ५ हजार चौरस मिटर जागेवर ॲल्युमिनियम इंजिनिअरींग युनिट सुरु करण्यासाठी जागेची मागणी केली असून या उद्योगात ३६० लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे विभागीय अधिकारी संगीतराव यांनी उद्योजकांना उद्योग उभारणी संदर्भातील संपूर्ण प्रकीया पूर्ण करुन जागे संदर्भातील पत्र तयार केले आहे. उद्योजकांना महाराष्ट्र औद्योगिक महामंडळ उद्योग उभारणी संदर्भात संपूर्ण सहकार्य असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.