उद्योजकांच्या माध्यमातून नक्षलग्रस्त भागातील स्थानिकांना रोजगार देणार- मुख्यमंत्री फडणवीस

0
15

नागपूर, दि. २१ – राज्यातील गडचिरोली आणि गोंदिया हा नक्षलग्रस्त भाग खनिज संपत्तीच्या बाबतीत समृध्द आहे. या खनिज संपत्तीचा उपयोग स्थानिक पातळीवरच केला जाईल. त्यासाठी या भागात उद्योजकांच्या माध्यमातून उद्योगाची निर्मिती करून स्थानिकांना रोजगार मिळवून देण्यात येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.
सिव्हील लाईन्स परिसरातील हैद्राबाद हाऊस येथील मुख्यमंत्री सचिवालयाच्या सभागृहात आयोजित नक्षलग्रस्त भागाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.
यावेळी केंद्रीय भुपृष्ठ परिवहन मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय रसायने व खते राज्यमंत्री हंसराज अहीर, राज्याचे उर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, राज्यमंत्री राजे अंबरीशराव आत्राम, खासदार नाना पटोले, महापौर प्रवीण दटके, विभागीय आयुक्त अनुपकुमार, नागपूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक रविंद्र कदम, गडचिरोलीचे जिल्हाधिकारी रणजित कुमार, गोंदियाचे जिल्हाधिकारी विजय सुर्यवंशी, गडचिरोली पोलिस अधिक्षक संदीप पाटील, गोंदिया पोलिस अधिक्षक शशीकुमार मीना, गडचिरोलीचे मुख्य कार्यकारी अधिकारी संपदा मेहता यांच्यासह वरिष्ठ अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.
पुढे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, नक्षलग्रस्त भागात पोलिस विभाग आणि इतर अधिका-यांच्या प्रयत्नामुळे नक्षल चळवळ कमजोर झाली आहे. ही योग्य संधी साधून या भागात उद्योजकांच्या माध्यमातून उद्योग निर्मितीवर भर देण्याचा शासनाचा विचार आहे. नक्षलग्रस्त भागात असलेल्या खनिज संपत्तीमुळे येथे उद्योजक येण्यास तयार आहेत. त्यांनी उभारलेल्या प्रकल्पाला केंद्र व राज्य शासनाकडून सुरक्षेची हमी व संपुर्ण मदत दिली जाईल. त्यामुळे नक्षलग्रस्त भागातील स्थानिक नागरीकांना रोजगाराची संधी उपलब्ध होईल. गडचिरोली आणि गोंदिया या भागातील नागरीकांच्या सर्वांगिण विकासासाठी शासनाचे प्राधान्य आहे. सुरवातीला येथील नागरीकांना प्रशिक्षणासोबतच रोजगाराची हमी सुध्दा देण्यात येईल. त्यामुळे लोकांमध्ये विश्वास निर्माण होण्यास मदत होईल, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
यावेळी नक्षलग्रस्त भागातील खनिज संपत्तीचा व इतर बाबींचा आढावा घेण्यात आला.

नक्षलग्रस्त भागात उद्योग उभारणीसाठी पायलट प्रोजेक्ट तयार करा–नितीन गडकरी
नक्षलग्रस्त भागातील बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी नक्षलग्रस्त भागात उद्योग उभारण्याची आवश्यकता आहे. नक्षलग्रस्त भागाच्या विकासासाठी केंद्र सरकार कटीबध्द आहे. उद्योग उभारणीसाठी राज्य शासनाने मागितलेली प्रत्येक मदत करण्यास केंद्र सरकार तयार आहे. नक्षलग्रस्त दुर्गम भागातील सिरोंचा, एटापल्ली व अहेरी या तालुक्यांमध्ये स्थानिक खनिजांवर आधारीत उद्योग उभारणीसाठी पायलट प्रोजेक्ट तयार करण्यात यावा, तसेच या उद्योगांसाठी लागणा-या कौशल्याचे प्रशिक्षण स्थानिक युवक-युवतींना देऊन सुमारे १५ ते २० हजार बरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करावा, अशी सुचना यावेळी केंद्रीय भुपृष्ठ परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी नक्षलग्रस्त जिल्ह्यातील अधिका-यांना केली.