शेअर बाजार गडगडला, सेन्सेक्समध्ये १५०० अंकांची घसरण

0
10

वृत्तसंस्था
मुंबई, दि. २४ – जागतिक बाजारात जोरदार घसरण झाल्याच्या परिणामी भारतीय शेअर बाजारही चांगलाच गडगडला असून मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स हा निर्देशांक १५०० अंकांनी खाली घसरला आहे. तर राष्ट्रीय बाजाराच्या निफ्टी या निर्देशांकांतही ४५५ पेक्षा अधिक अंकांची घसरण झाली.
सोमवारी सकाळपासून भारतीय शेअर बाजारात घसरगुंड सुरु असून दुपारनंतर परिस्थितीत आणखी खालावली. सेन्सेक्समध्ये तब्बल १५०० अंकांची घसरण झाली व निर्देशांक थेट २६ हजारच्या खाली गेला. तर निफ्टीही ४५५ अंकांनी घसरुन ७,९०० वर पोहोचला.
चीनी चलनाचे झालेले अवमूल्यन हे या घसरणीमागचे मोठं कारण मानले जात आहे. शांघाय शेअर बाजारातील शेअर्स ७.७ टक्के घसरले असून या घसरणीमुळे आशियाई शेअर्स तीन वर्षांच्या नीचांकी पाततळीवर पोचले आहेत.
दरम्यान या घसरणीचा परिणाम रुपयाच्या किंमतीवरही झाला असून एका डॉलरच्या तुलनेत रुपयाची किंमत ६६.४९ इतकी झाली आहे. गेल्या दोन वर्षांतील हा सर्वात नीचांकी दर ठरला आहे.
दरम्यान शेअर बाजारातील घसरणीमुळे ग्राहकांमध्ये चिंतेचे वातावरण असले तरी सध्या काळजीचे काही कारण नसल्याचे सांगत रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. इतर देशांच्या तुलनेत भारत सुस्थितीत असल्याचेही ते म्हणाले. भारतीय बाजारात लवकरच स्थिरता येईल असा विश्वास व्यक्त करत केंद्र सरकार व आरबीआय परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहे अशी प्रतिक्रिया अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दिली.