इनोप्रोमच्या माध्यमातून रशियासोबतचे ऋणानुबंध दृढ करणार – मुख्यमंत्री

0
7

मुंबई(mahanews) : इनोप्रोम या उपक्रमाच्या माध्यमातून रशियासोबत असलेल्या ऋणानुबंधांना अधिक दृढ करण्याचा आमचा प्रयत्न असून रशियाच्या विकास प्रक्रियेचा अनुभव आणि राज्यातील महत्त्वाकांक्षी तरूणाई यांच्या समन्वयातून औद्योगिक क्षेत्रात निश्चितच मोठे परिवर्तन घडवून आणणे शक्य होईल, अशा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज रशियातील इकेटेरिनबर्ग येथे व्यक्त केला. महाराष्ट्रातील गुंतवणुकीच्या संधींचा शोध घेण्यासाठी रशियन उद्योग समुहांच्या प्रतिनिधींचे शिष्टमंडळ पुढील महिन्यात राज्यात येणार आहे, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.

रशियातील इकेटेरिनबर्ग येथे इनोप्रोम-2016 या आंतरराष्ट्रीय उद्योग आणि व्यापारविषयक मेळाव्यास आज प्रारंभ झाला. या उपक्रमासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील शिष्टमंडळ तीन दिवसांच्या रशिया दौऱ्यावर आहे. या मेळाव्यात आयोजित इंडो-रशियन बिझनेस फोरममध्ये सहभागी उद्योजकांना मुख्यमंत्र्यांनी मार्गदर्शन केले. या फोरमच्या उपक्रमात दीडशे उद्योग समूह व वाणिज्यिक संस्था तसेच चारशेहून अधिक प्रतिनिधी सहभागी झाले आहेत.

महाराष्ट्रातील गुंतवणुकीच्या संधींचा शोध घेण्यासाठी रशियन उद्योग समुहांच्या प्रतिनिधींचे शिष्टमंडळ राज्यात पाठविण्यास रशियन सरकारने सहमती दर्शविल्याबाबत मुख्यमंत्र्यांनी आनंद व्यक्त केला. ते म्हणाले, रशिया आमच्यासाठी केवळ एक व्यावसायिक भागीदार असलेला देश नाही, तर त्यापलीकडे आमचे रशियाशी ऋणानुबंध आहेत. इनोप्रोम या उपक्रमाच्या माध्यमातून या ऋणानुबंधांना अधिक दृढ करण्याचा आमचा प्रयत्न आहे. रशियाच्या विकास प्रक्रियेचा अनुभव आणि राज्यातील महत्त्वाकांक्षी तरूणाई यांच्या समन्वयातून औद्योगिक क्षेत्रात निश्चितच मोठे परिवर्तन घडवून आणणे शक्य आहे. इज ऑफ डुईंग बिझनेसच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या उद्योग क्षेत्राच्या विकासासाठी शासनाने हाती घेतलेल्या विविध उपाययोजनांची माहिती देऊन विस्तृत किनारपट्टी आणि बंदरांची नैसर्गिक देणगी लाभलेल्या महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासाचे पर्व सुरू झाल्याचे यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

तत्पूर्वी, इनोप्रोम-2016 या उद्योग-व्यापार विषयक मेळाव्यातील इंडिया पॅव्हेलियनचे उद्घाटन केंद्रीय उद्योग आणि वाणिज्य राज्यमंत्री निर्मला सीतारामन यांच्या हस्ते झाले. राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधराराजे सिंधिया, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू, रशियन वाणिज्यमंत्री डेनिस मँतूरोव्ह यांचीही यावेळी उपस्थिती होती.

स्वेर्डलोव्हेस्क प्रांताशी सामंजस्य करार

रशियातील स्वेर्डलोव्हेस्क प्रांत आणि महाराष्ट्रादरम्यान यावेळी विविध क्षेत्रातील सहकार्याबाबतचा सामंजस्य करार या प्रांताचे गव्हर्नर एडूअर्ड रोसेल आणि श्री. फडणवीस यांच्या उपस्थितीत करण्यात आला. त्यानुसार खनिकर्म, रेल्वे प्रकल्प आणि अभियांत्रिकी क्षेत्रातील औद्योगिक गुंतवणुकीला चालना देण्यासह तांत्रिक विद्यापीठांच्या उभारणीसाठी सहकार्य करण्यासाठी स्वेर्डलोव्हेस्क आणि महाराष्ट्राकडून संयुक्त कृती गट स्थापन करण्यात येणार आहे. तसेच राज्यातील गुंतवणुकीला चालना देण्यासाठी ऊरल चेंबर ऑफ कॉमर्सच्या पुढाकाराने पुढील महिन्यात श्री. रोसेल यांच्या नेतृत्वाखालील प्रतिनिधी शिष्टमंडळ महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहे. ऊरल प्रांतातील पायाभूत सुविधांची उभारणी करणाऱ्या उद्योगांना राज्यातील प्रकल्पांमध्ये सहभागी होण्याचे निमंत्रण मुख्यमंत्र्यांनी दिले. प्रस्तावित नागपूर-मुंबई महाराष्ट्र समृद्धी महामार्ग, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, विविध मेट्रो प्रकल्प आणि स्मार्ट सिटीज यांच्या कामात या कंपन्यांचा सहयोग अपेक्षित आहे. गव्हर्नर श्री. रोसेल यांनी या सर्व निर्णयांच्या पाठपुराव्यासाठी स्वेर्डलोव्हेस्कच्या वाणिज्य व्यवहारमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली एका कृतीगटाची नियुक्ती केली आहे. यावेळी ऊरल फेडरल युनिव्हर्सिटी आणि राज्यातील विद्यापीठे यांच्यात सांस्कृतिक देवाण-घेवाणी अंतर्गत विविध उपक्रम राबविण्याचे ठरविण्यात आले. त्यात मराठी नाटकांचे रशियात प्रयोग आणि भारतीय चित्रपटांचे रशियन भाषेत भाषांतर यासारख्या उपक्रमांचा समावेश आहे.

रशियन-भारतीय कंपन्यांची संयुक्त परिषद प्रस्तावित

रशियन फेडरेशनचे उद्योग आणि व्यापार मंत्री डेनिस मँतुरोव्ह यांच्यासोबत झालेल्या भेटीत रशियन संरक्षण क्षेत्रातील उद्योजकांना महाराष्ट्रात संरक्षण उत्पादन क्षेत्रात गुंतवणूक करण्याचे निमंत्रण मुख्यमंत्र्यांनी दिले. विशेषत: नागपुरात एअरफोर्स मेंटेनन्स कमांड असल्याने त्याचा लाभ घेण्याचे आवाहनही त्यांनी केले. महाराष्ट्र आणि रशियाला संयुक्तपणे काम करणे शक्य असलेल्या क्षेत्राबाबत यावेळी चर्चाही झाली. रशियन आणि भारतीय कंपन्यांची परस्पर सहकार्यासाठी अशी एक संयुक्त परिषद येत्या ऑक्टोबर महिन्यात आयोजित करण्याचे उभय नेत्यांनी प्रस्तावित केले. तसेच तोमस्क येथील तंत्रविज्ञान संस्थेसोबत मुंबई आयआयटीचे सहकार्य वाढविण्याबाबत सुद्धा प्राथमिक स्वरूपाची चर्चा झाली.

रशियातील खांटी-मान्सीयास्क या प्रांताचे डेप्युटी गव्हर्नर झेबोझ्लॅव्ह अलेक्सी यांनीही श्री. फडणवीस यांची भेट घेऊन चर्चा केली. खांटी-मान्सीयास्क हा प्रांत रशियामधील तेलवायू उत्पादनात अग्रेसर असून महाराष्ट्रासोबत आर्थिक सहकार्याचा सामंजस्य करार करण्याबाबत श्री. अलेक्सी यांनी मुख्यमंत्र्यांकडे विनंती केली.