विमानसाठीच्या निर्माण उद्योगामध्ये नागपूर हे जगातील प्रमुख केंद्र-मुख्यमंत्री फडणवीस

0
8

नागपूर, दि 20 : बोईंग विमानासाठी टाटा उद्योग समूहाच्या ‘ताल’मॅन्युफॅक्चरिंग सोलुशन उद्योग समूहातर्फे अत्यंत उच्च दर्जाचे फ्लोअर बिम निर्माण करुन मिहानचे नाव जागतिक स्तरावर पोहचविले असून बोईंग एमआरओ व ताल उद्योग समूहामुळे विमानासाठी लागणाऱ्या सुटे भाग निर्मिती व देखभालीसाठी जगातील प्रमुख केंद्र म्हणून विकसित होत असल्याचे प्रतिपादन
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.

मिहान येथे टाटा उद्योग समूहाच्या ताल मॅन्युफॅक्चरिंग सोलुशनतर्फे ड्रीमलायनर 787 या बोईंग विमानासाठी निर्माण केलेल्या पाच हजाराव्या फ्लोअर बिमच्या पुरवठा संदर्भातील कन्साईनमेंटचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. तसेच विमानासाठी लागणाऱ्या सुटे भाग निर्मिती विभाग जेनेरिक मॅन्युफॅक्चरिंग युनिटचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले, त्याप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी, बोईंगचे वरिष्ठ उपाध्यक्ष डॉ. दिनेश केसकर, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर प्रवीण दटके, पद्मश्री डॉ. रघुनाथ माशेलकर, खासदार कृपाल तुमाने, तालचे चेअरमन आर. एस. ठाकूर, टाटा मोटर्सचे व्यवस्थापकीय संचालक गुंटेर बस्चेक, कार्यकारी संचालक राजेश खत्री आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

एअरो स्पेस इको सिस्टिमसाठी मिहान येथे जागतिक स्तराच्या आवश्यक सर्व सुविधा निर्माण झाल्या असल्यामुळे टाटा उद्योग समूहाचे तालतर्फे बोईंग 787 या विमानासाठी फ्लोअर बिम निर्माण करुन नागपूरचे नाव जागतिक स्तरावर पोहचविल्याबद्दल विशेष अभिनंदन करतांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, बोईंगचे वरिष्ठ उपाध्यक्ष डॉ. दिनेश केसकर यांच्या प्रयत्नामुळे एमआरओ नंतर ‘ताल’ सुरु झाले आहे. ताल हे मिहानसाठी ब्रँड अम्बॅसेडर ठरणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मेक इन इंडिया या संकल्पनेतील नागपूर हे मेड फॉर वर्ल्ड झाले आहे.

एअर बससाठी आवश्यक असणारे सुटे भाग सुद्धा निर्माण करणारी ‘ताल’ हीजगातील एकमेव कंपनी असल्याचे सांगतांना मुख्यमंत्री पुढे म्हणाले की,नागपूर येथील युवकांनी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन बोईंगसाठी लागणारे महत्त्वाचे फ्लोअर बिम तयार करण्यासाठी सहभाग दिला असून युवकांचे अभिनंदन करतांना जागतिक स्तरावरील उत्पादनासाठी आवश्यक असणारे मनुष्यबळ
नागपूरसह विदर्भात असल्यामुळे जागतिक स्तरावरील एव्हिएशन कंपनी तसेच प्रवासी विमाने मिहान येथील एमआरओमध्ये देखभाल व दुरुस्तीसाठी येणार असून यासंदर्भात स्पाईस जेटसोबत करार करण्यात आला आहे.

केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी मिहान येथे तालसारख्या जागतिक दर्जाच्या उत्पादन निर्मिती उद्योगामुळे नागपूर जागतिक स्तरावर पोहचले असून बोईंग देखभाल व दुरुस्ती केंद्रामुळे या क्षेत्रात मोठी संधी निर्माण झाली आहे. नागपूर परिसरातील अभियांत्रिकी क्षेत्रातील तज्ज्ञ मनुष्यबळ उपलब्ध असल्यामुळे विमानसाठी लागणाऱ्या सुट्या भागाच्या निर्मितीला प्रोत्साहन मिळणार आहे. उद्योग सुरु करतांना प्राधान्याने स्थानिक युवकांना रोजगार उपलब्ध करुन देण्याच्या संकल्पनेनुसार 50 हजार युवकांना रोजगार निर्मितीचे उद्दिष्ट आहे. मिहानमध्ये सीप्लेन तयार
करण्यासोबत सरंक्षण उत्पादनाला सुरुवात करावी. केंद्र व राज्य शासनातर्फे संपूर्ण सहकार्य करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

बोईंगच्या विक्री विभागातील वरिष्ठ उपाध्यक्ष दिनेश केसकर यांनी मिहान येथे जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा निर्माण झाल्यामुळे येरोस्पेस उपयोगासोबतच विमानासाठी लागणाऱ्या सुट्टयाभाग निर्मितीमध्ये नवे दालन येथे निर्माण झाले आहे. मोहिमच्या ड्रिमलायनर 787 या विमानासाठी प्लोअर बिम तयार करताना त्याची गुणवत्ता व दर्जा उत्तम ठेवल्यामुळेच जगात नागपूर
हे केंद्र महत्वाचे ठरले आहे. मोहिम देखभाल दुरुस्तीचे केंद्र तसेच ताल हे विमानाचे सुट्टयाभाग निर्मितीचे केंद्र सुरु करुन येथील तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. मी ज्या शहरात शिकलो त्या मातीचे ऋण मी फेडू शकला याचा मला अभिमान असल्याचे त्यांनी आपल्या भाषणात सांगितले.
ताल चे कार्यकारी संचालक तथा सीइओ राजेश खत्री यांनी स्वागत करुन प्रास्ताविक भाषणात बोईंगसाठी आवश्यक असणाऱ्या प्लोअर बिमची निर्मिती पहिल्या 22 महिण्यातच करण्यात आली असून 5 हजारावे प्लोअर बिम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बोईंग अमेरिकेला पाठविण्यात येत आहे. 300 कोटी रुपये गुंतवणूक असलेल्या या उद्योगामध्ये अत्याधुनिक व जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध असल्यामुळे तसेच तज्ज्ञ 550 कौसल्यपूर्ण तज्ज्ञ कर्मचारी कार्यरत आहेत. 80 टक्के स्थानिक कौसल्यपूर्ण कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अमेरिका वगळता
जगातील ताल ही एकमेव कंपनी बोईंगच्या 787, 9 आणि 787-10 ड्रिमलायनर विमानासाठी सुटे भाग पुरवित आहेत. बोईंगसोबत सहकार्य करुन जागतिक गुणवत्तेनुसार सुट्टेभाग पुरविणारी ही संस्था असल्याचे त्यांनी सांगितले.