रिलायन्सचा ‘जिओ फोन’ लाँच; फुकटात

0
9

मुंबई,21-सबकुछ फुकट, अशी ‘जिओ ऑफर’ देऊन गेल्या वर्षी मोबाइल विश्वात धमाल उडवणाऱ्या रिलायन्सनं आज मोफत ‘जिओ फोन’ची घोषणा करून ग्राहकांना सुखद धक्का आणि प्रतिस्पर्ध्यांना ‘जोर का झटका’ दिला आहे. कंपनीच्या ४०व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत रिलायन्स इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांनी हा फीचर फोन लाँच केला.
येत्या १५ ऑगस्टपासून जिओ फोनची चाचणी सुरू होणार असून २४ ऑगस्टपासून जिओ फोन बुक करता येणार आहे. त्यासाठी १५०० रुपयांची अनामत रक्कम भरावी लागेल. पण, तीन वर्षं फोन वापरल्यानंतर ही रक्कम ग्राहक हवी तेव्हा परत घेऊ शकतात, असं मुकेश अंबानी यांनी जाहीर केलं. या जिओ फोनवर १५३ रुपयांत जिओ अनलिमिटेड धनधनाधन प्लॅन उपलब्ध असेल, तर जिओ ग्राहकांसाठी व्हॉइस कॉलिंग कायमच मोफत राहणार असल्याची खुशखबरही अंबानी यांनी दिली. ५० कोटी मोबाइल यूजर्सपर्यंत जिओ फोन पोहोचवण्याचा निर्धार कंपनीनं केला आहे.