शंकरसिंह वाघेलांची काँग्रेसमधून हकालपट्टी

0
10

अहमदाबाद,दि,21-गेल्या काही दिवसांपासून भाजपच्या वाटेवर असलेल्या व आज स्वत:च्या वाढदिवशी मोठी घोषणा करण्याचे संकेत देणारे गुजरात काँग्रेसचे नेते व माजी मुख्यमंत्री शंकरसिंह वाघेला यांची काँग्रेसमधून हकालपट्टी करण्यात आली आहे.
वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात वाघेला यांनी स्वत: ही माहिती दिली. ‘२४ तासांपूर्वीच काँग्रेस पक्षानं मला पक्षातून काढलं आहे. मात्र, मी आजही पक्षासोबतच आहे,’ असं वाघेला यांनी यावेळी सांगितलं. येत्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसनं आपल्याला मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून घोषित करावं, अशी वाघेला यांची मागणी होती. मात्र, काँग्रेस हायकमांडनं त्यांना फारसा प्रतिसाद दिला नाही. वाघेला यांना मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार म्हणून पुढं केल्यास मूळचे काँग्रेसी नाराज होतील, असं पक्षाकडून त्यांना सांगण्यात आलं होतं. त्यामुळं वाघेला नाराज होते.
भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी वाघेला यांची ही तगमग ओळखून त्यांच्याशी चर्चा सुरू केली होती. त्यामुळं वाघेला पुन्हा भाजपमध्ये परतणार, अशी चर्चा होती. या संदर्भात आज महत्त्वपूर्ण घोषणा करणार असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. त्याआधीच काँग्रेसनं त्यांना बाहेरचा रस्ता दाखवला. लवकरच ते भाजपमध्ये प्रवेशाची घोषणा करतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे.