शेतकरी मृत्यूप्रकरणी कृषी अधिकारी व मोहीम अधिकार्यांना त्वरित निलंबित करा- भागवत देवसरकर

0
13

नांदेड ,दि.8 – यवतमाळ जिल्ह्यात औषध फवारणीमुळे विषबाधा होऊन 23 शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे.या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करण्यासाठी सरकारने चौकशी समिती स्थापन करुन या प्रकरणातील दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी मुख्यंमत्री व कृषीमंत्री यांच्याकडे पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष भागवत देवसरकर यांनी केली आहे.
यवतमाळ जिल्ह्यात मागील काही दिवसामध्ये फवारणीच्या औषधामुळे विषबाधा होऊन 23 शेतकरी मृत पावले. तर शेकडो शेतकरी बांधव रुग्णालयात उपचार घेत आहेत. या गंभीर प्रकरणाची कृषी विभागाने वेळीच दखल न घेतल्यामुळे जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी दत्तात्रय कळसाईत, प्रभारी मोहीम अधिकारी संजय वानखेडे, जिल्हा गुंणनियंत्रण अधिकारी फुटाने, उपविभागीय कृषी अधिकारी कैलास वानखेडे यांना तातडीने निलंबित करावे. त्यासोबतच संबंधित औषध कंपन्यांविरूद्ध सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करावे.आणि पीडित शेतकरी व त्यांच्या कुटुंबांना तात्काळ 10 लाख रुपयांची आर्थिक मदत द्यावी व उपचारचा सर्व खर्च सरकारने करावा, अशी मागणी भागवत देवसरकर यांनी केली.यावेळी प्रदेश संघटक चक्रधर पाटील देवसरकर, नरेश पाटील इंंगोले, जिल्हाध्यक्ष राम कदम, सतीष ठाकरे, अमोल पंतिगराव, प्रतीश अडकिने, गजानन पाटील कदम, सुधाकर गायकवाड, जय सावदे, शकंर कदम उपस्थित होते.