जलयुक्त शिवार अभियानासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही- जलसंधारण मंत्री प्रा.राम शिंदे

0
23

उस्मानाबाद.दि.18:- दुष्काळमुक्त जिल्हा, राज्य हा आपला सर्वांचा संकल्प आहे. त्यासाठी पाण्याचा थेंब नी थेंब वाचवायचा आहे, साठवायचा आहे, यासाठी जलयुक्त शिवार अभियानचे काम चांगल्या प्रकारे चालू असून या कामासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही, असे प्रतिपादन जलसंधारण मंत्री प्रा.राम शिंदे यांनी आज केले.
परंडा तालुक्यातील हिंगणगाव(बु) येथील जलयुक्त शिवार योजनेंतर्गत बांधण्यात आलेल्या सिमेंट नाला बांधाऱ्याची पाहणी त्यांनी केली गावातील यमाई देवीच्या प्रांगणात ग्रामस्थांशी संवाद साधतांना ते बोलत होते. यावेळी आमदार सुजितसिंह ठाकूर, उपविभागीय अधिकारी स्वप्नील मोरे, परंडा तहसिलदार अनिलकुमार हेळकर, कार्यकारी अभियंता अनिल कांबळे, उप अभियंता श्री.मोरे, सौदार गोरे, बळीराम मारकड, तुकाराम कुरुंद, नाना कदम, पंडीत गोरे, राहुल ठोंगे, प्रविण नवले, ज्ञानेश्वर ठोंगे, राहुल कुरुंद, अमोल दरेकर, सागर ठोंगे, अनुरुद्र गोरे, विजय कुरुंद यांच्यासह ग्रामस्थ उपस्थिती होती.
मंत्री प्रा.शिंदे म्हणाले की, जलयुक्त शिवार अभियानचे काम चांगल्या प्रकारे चालू असून ज्या पध्दतीने जलयुक्त शिवारचे काम चालू आहे त्यातून दुष्ळाळी परिस्थिती परत निर्माण होवूच शकणार नाही, या कामासाठी अजून निधी लागला तर निधी दिला जाईल.यावेळी आमदार श्री.ठाकूर यांनी जलयुक्त शिवार च्या माध्यमातून या जिल्ह्यात, या तालुक्यात झालेल्या कामांमुळे दुष्काळ नक्की मिटणार आहे, असा विश्वास व्यक्त केला. जलसंधारण मंत्री प्रा. शिंदे यांनी जलयुक्त च्या कामासाठी चार कोटीचा सर्वाधिक निधी मंजूर केल्याबदद्ल त्यांचे आभार व्यक्त केले.जलसंधारण विभागांतर्गत हिंगणगाव(बु) येथील बांधण्यात आलेल्या सिमेंट नाला बंधाऱ्याची त्यांनी यावेळी पाहणी करुन जलपूजन केले.