जनतेनी जलसाक्षता मोहिमेत सहभाग नोंदवा- जिल्हाधिकारी दिवसे

0
37

भंडारा,दि. 18 :- राज्यातील वापरायोग्य पाण्याची उपलब्धता मर्यादित असून गरजेपेक्षा कमी आहे. वाढती लोकसंख्या, वाढते उद्योग व अनियमित पर्जन्यमान यामुळे भविष्यात उपलब्ध पाण्यावरील ताण आणखी वाढणार आहे. उपलब्ध पाणी सर्व वापरकर्त्यांना त्यांच्या गरजेच्या प्रमाणात उपलब्ध होण्यासाठी पाण्याचा वापर अत्यंत काटकसरीने व नियोजनबध्द पध्दतीने करण्याची आवश्यकता असून यासाठी समाजात जलजागृती व जलसाक्षरता निर्माण करण्यासाठी शासनाने प्रत्येक जिल्हयात जलकर्मी, जलदूत व जलसेवक म्हणून स्वच्छेने काम करण्याची संधी नागरिकांना उपलबध करुन दिली आहे. या अंतर्गत भंडारा जिल्हयात ज्या व्यक्तींना जलसाक्षरता मोहिमेत स्वयंस्फूर्तपणे सहभागी व्हायचे आहे त्यांनी आपली नावे 20 नोव्हेंबर पर्यंत नोंदविण्याचे आवाहन जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी केले आहे.
पाणी आणि जीवन हे एक अतूट नाते आहे. पृथ्वी तलावरील एकूण पाण्याच्या केवळ तीन ते चार टक्केच गोड पाणी नदी, तळे व तत्सम जलस्त्रोतांच्या स्वरुपात मानवाच्या वापरासाठी उपलब्ध आहे. गेल्या काही वर्षातील पावसाचा लहरीपणा आपण अनुभवतो आहे. पावसाच्या या लहरीपणाचा शेती, पशुधन तसेच पिण्याच्या पाणी पुरवठयावर प्रचंड ताण पडत आहे. परिणामी भूपृष्ठावरील व भूगर्भातील जलसंपत्तीचा वापर प्रचंड वाढल्याने पाणी कमी होत आहे. त्यामुळे पाण्याबाबत लोकांची समज व उमज वाढावी, सातत्याने लोक जागर व्हावा, पाण्याचा वापर नेमका व्हावा, यासाठी कायमस्वरुपी जलसाक्षरता मोहिम हाती घेण्यात आली आहे.
या मोहिमेत नागरिकांना जलसाक्षरतेबाबत स्वयंस्फूर्तपणे काम करण्याची संधी असणार आहे. प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये एक जलसेवक, प्रत्येक तालुक्यात 10 जलदूत व जिल्हयात 30 जलकर्मी यांना या मोहिमेसाठी निवडण्यात येणार आहे. ज्यांना गावात काम करायचे आहे त्यांनी आपल्या नावाची नोंदणी ग्रामसेवक यांच्याकडे, ज्यांना तालुक्यात काम करायचे आहे त्यांनी तहसिलदाराकडे 20 नोव्हेंबरपर्यंत आपल्या नावाची नोंदणी करावी. जलसाक्षरतेचे कार्य हे सेवेचे कार्य असणार असून यासाठी कुठलेही मानधन दिले जाणार नाही. या जलदूत व जलसेवकांना जलकेंद्रामार्फत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. सामाजिक जबाबदारी म्हणून हे काम पार पाडावे लागेल. पाणी विषयात काम करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी शासनाने चांगली संधी उपलब्ध करुन दिली आहे.
शासनाने यशदा पूणे, वन अकादमी चंद्रपूर, वाल्मी औरंगाबाद व डॉ. पंजाबराव देशमुख विदर्भ विकास प्रशासकीय प्रशिक्षण प्रबोधिनी अमरावती येथे विभागीय जलसाक्षरता केंद्र स्थापन केले आहे. या केंद्रामार्फत राज्यात कायमस्वरुपी जलसाक्षरता मोहिम राबविण्यात येणार आहे. जिल्हास्तरावर काम करणाऱ्या जलकर्मींचे कार्य जलसाक्षरता प्रक्रियेत समन्वय म्हणून असणार आहे. जलसाक्षरतेसाठी सर्व प्रकारची पूरक माहिती उपलब्ध करुन देणारा व तांत्रिक सल्ला देणारा जलकर्मी महत्वपूर्ण घटक असेल. तालुकास्तरावरील जलदूत जलसेवकांच्या कार्यक्रमामध्ये प्रशिक्षक म्हणून काम करणे तसेच इतर प्रशिक्षण वर्गामध्ये योगदान देणे आणि तालुकांतर्गत समन्वय ठेवणे तसेच प्रसंगी जलसेवकांना सर्व प्रकारचे पाठबळ देणे हे काम करेल.
जलसेवक, जलदूत व जलकर्मी यांची निवड त्यांचे या क्षेत्रातील काम पाहून तालुकास्तरीय, जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय समित्या करणार आहे. यासोबतच गाव तालुका, जिल्हा व राज्यस्तरावर जलसाक्षरता समित्या गठित करण्यात आल्या असून या समित्यामार्फत प्रशिक्षणाचे सनियंत्रण होणार आहे. जलसाक्षरता चळवळीद्वारे पाण्याचा सुयोग्य वापर करण्यासाठी लोक प्रबोधन, जलस्त्रोताचे पुनरुज्जीवन व संवर्धन पाणी हक्काचे मालकीचे जाणीव व त्यासोबतच्या जबाबदारी कर्तव्याबाबत जागरुकता वाढविली जाणार आहे. इच्छुक व्यक्तींनी आपली नोंदणी करुन चळवळीत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी केले आहे.