परीक्षेस उशीर झाल्याने पत्नीला प्रवेश नाकारला, पतीचा हृदयविकाराने मृत्यू

0
15

नांदेड,दि.23ः-कृषी सहायक पदाच्या परीक्षेत केवळ पाच मिनिटाचा उशीर झाल्याने पत्नीस परीक्षा हॉलमध्ये प्रवेश नाकारल्याने मानसिक तणावातून पतीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. ही घटना आज शहरापासून जवळच असलेल्या होरायझन शाळेत घडली.या मृत्यूस शाळेचे व्यवस्थापन जबाबदार असून व्यवस्थापनावर खुनाचा गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी मृताच्या नातेवाईकांनी गोंधळ घातल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

वसमत तालुक्यातील कुरुंदा येथील मुक्ता देशमुख यांची आज शहरापासून जवळच असलेल्या विष्णूपुरी येथील होरायझन शाळेमध्ये कृषी सहायक पदासाठीची परीक्षा होती. या परिक्षेस मुक्ता देशमुख यांचे पती गजानन देशमुख हे परीक्षा केंद्रावर त्यांना सोडण्यासाठी आले होते.परंतु परीक्षा सुरु होवून काही मिनिटे झाली असताना परीक्षा केंद्रावरील व्यवस्थापनाने त्यांना प्रवेश नाकारला. परीक्षा केंद्रावर प्रवेश नाकारल्यामुळे मानसिक तणावातून गजानन देशमुख यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यांचे निधन झाले.या घटनेचे वृत्त मुक्ता देशमुख यांनी नांदेडमधील आपल्या नातेवाईकांना कळविले. त्यांचे नातेवाईक घटनास्थळी दाखल झाले आणि गजानन देशमुख यांच्या मृत्यूस कारणीभूत झाल्याबद्दल होरायझनच्या व्यवस्थापनाविरुध्द खुनाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली. होरायझन परिसरात यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती कळताच उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील, ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक व्दारकादास चिखलीकर यांनी घटनास्थळी धाव घेत मृताच्या नातेवाईकांना समजविण्याचा प्रयत्न केला.