सरसम जिल्हा परिषद शाळेस आयएसओ मानांकन प्राप्त

0
20

नांदेड,दि.23ः-  जिल्हा परिषदेंतर्गत येत असलेल्या सरसमच्या जिल्हा परिषद शाळेस आयएसओ 9001:2015 मानांकन प्रमाणपत्र आज(दि.23) वितरित करण्यात आले. या वितरण सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बालाजी मंडलवाड हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून पंचायत समितीच्या सभापती मायाताई राठोड, गट विकास अधिकारी सुधीश मांजरमकर, विस्तार अधिकारी गायकवाड, गट शिक्षण अधिकारी रमेश संगपवाड, सरसमचे प्रतिष्ठित व्यापारी रवींद्र दमकोंडवार, पोलीस पाटील माधव नरवाडे,गोविंद गोडसेलवार, दत्ता शिराणे, संजय कवडे, साईनाथ धोबे यांच्यासह शेकडो गावकरी उपस्थित होते. तसेच आयएसओ तर्फे अनिल येवले आणि योगेश जोशी हे हजर होते.
प्रस्ताविका शाळेचे सह शिक्षक राम कोटगिरे यांनी 2015 ची शाळा आणि आज आयएसओ मानांकन प्राप्त शाळा या सर्व प्रवासाचा संपूर्ण आढावा सांगितला. केवळ तीन वर्षांपूर्वी ज्या शाळेस आज ना उद्या बंद पडणार असे म्हणायचे तीच शाळा आज थेट आयएसओ प्रमाणपत्र मिळविते. यासाठी ग्राम पंचायत, शाळा व्यवस्थापन समिती आणि सर्व गावकऱ्यांचे सहकार्य मिळत गेले आणि सर्व कामं सुरळीत होत गेले याचा  उल्लेख त्यांनी केला. त्याचप्रमाणे नांदेड येथील प्रसिद्ध पोटविकार तज्ञ डॉ. आशिष मोतेवार यांनी शाळेसाठी दिलेल्या भरघोस मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
14 व्या वित्त आयोगातून शाळेसाठी खर्च करण्यात सरसम ग्रामपंचायत जिल्ह्यात अग्रेसर असल्याचे गट विकास अधिकारी सुधीश मांजरमकर यांनी सांगितले तसेच शाळेसाठी अजून निधी लागत असेल तर तो देखील पुरविण्यात येईल असे अभिवचन त्यांनी दिले.गट शिक्षण अधिकारी रमेश संगपवाड यांनी शिक्षकांनी अतिशय परिश्रम पूर्वक कार्य करून सर्वांसाठी एक उत्तम उदाहरण समोर ठेवल्याचे गौरवोद्गार काढले. तसेच आजूबाजूच्याच नाहीतर राज्यातील शाळांनी या शाळेस भेट देऊन बरेच काही शिकण्यासारखे असल्याचे सांगितले.
अनिल येवले यांनी सर्वाना मंत्रमुग्ध करून टाकले. त्यांनीसुद्धा शाळेतील कारंजे, सुंदर व्यासपीठ, सीसीटीव्ही, परसबाग, गवताचे लॉन या सर्व बाबींचे कौतुक करताना गावाच्या सहकार्याने शिक्षकांना देखील नवी उमेद मिळत असते त्यामुळे आपापल्या गावातील सरकारी शाळांना पालकांनी असेच सहकार्य करत राहिल्यास सर्वच शाळा लवकरच अशाच सुंदर बनतील असा विश्वास व्यक्त केला.
त्याचबरोबर सायप्रस इंग्लिश स्कुलच्या रेखा मॅडम यांनी देखील शाळेतील बदल आणि वेग पाहून थक्क झाल्याचे मत व्यक्त केले.
शेवटी शाळेचे मुख्यध्यापक गणेश कोकुलवार, सह शिक्षक राम कोटगिरे, कैलास नकुले, चक्रधर देशमुख, मेश्राम सर, देशपांडे मॅडम, चाटे मॅडम आणि फरिया इनामदार मॅडम यांच्या सोबत पंचायत समिती सभापती मायाताई राठोड आणि गट शिक्षणाधिकारी रमेश संगपवाड यांनी असंख्य पालक आणि विद्यार्थी यांच्या टाळ्यांच्या प्रचंड गडगडाटात प्रमाणपत्राचा स्वीकार केला.
कार्यक्रमाचे सूत्र संचलन कैलास नकुले यांनी तर आभार प्रदर्शन मुख्याध्यापक गणेश कोकुलवार यांनी केले.