बॅंकांना व्याजदर कमी करावेच लागतील – राजन

0
10

मुंबई दि.7- बॅंकांच्या हाती खेळता पैसा राहावा यासाठी भारतीय रिझर्व्ह बॅंकेने वेळोवेळी रेपो दरात कपात केली आहे. त्यानंतरही बॅंका कर्जे स्वस्त करण्यासाठी उत्सुक दिसत नाहीत. ही स्थिती खेदजनक असून बॅंकांना आगामी काळात कर्जांवरील व्याजदर कमी करावेच लागतील असा आग्रह रिझर्व्ह बॅंकेचे (आरबीआय) गवर्नर डॉ. रघुराम राजन यांनी धरला.

बॅंकेच्या मुख्यालयात मुंबईत आज राजन यांनी आरबीआयच्या पतधोरणाचा आढावा जाहीर केला. नव्या आर्थिक वर्षातील पहिल्याच पतधोरण आढाव्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. या आढाव्यामध्ये रेपो दर तसेच सीआरआरमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

कर्जे देताना ती चढ्या व्याजदराने देण्याची किंवा कर्जांसाठी किमान व्याजदर सांगणारा आधारदर वाढवण्यासाठी तसेच तो बदलण्याची गरज बॅंकांना आहे असे वाटत नाही, असे डॉ. राजन यांनी स्पष्ट केले. आधारदर बदलण्यासारखी स्थितीही दिसत नाही. त्यामुळे बॅंकांनी कर्जांवरील व्याजदर कमी करणेच आता श्रेयस्कर आहे. कर्जामध्ये वाढ झाल्याखेरीज बॅंकांच्या एकूण उलाढालीत वाढ होत नाही. केवळ मुदत ठेवी घेऊन बॅंका मोठ्या होणार नाहीत हे सत्य असल्याने याचा साकल्याने विचार करून बॅंका कर्जांवरील व्याजदर घटवतील असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला.