आलापल्ली-भामरागड मार्गावर दिसला रानगवा

0
8

आलापल्ली दि.७: आलापल्ली-भामरागड मार्गावरील आलापल्लीपासून अगदी जवळच असलेल्या पुन्नागुडम जंगलात सोमवारी संध्याकाळी एका वयस्क रानगव्याने दर्शन दिले. जंगलातील वणव्यामुळे त्रस्त होऊन हा रानगवा या परिसरात आला असावा, असा अंदाज आहे.
सिरोंचा वनविभागांतर्गत कोलामार्का जंगलात रानगवे आढळून येतात. हे जंगल रानगव्यांसाठी संरक्षित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले असून, अभयारण्य म्हणूनही कोलामार्का जंगलाला ओळखले जाते. शासनाने रानगव्यांचे जतन करण्यासाठी मोठा निधीही दिला आहे. मात्र कोलामार्कापासून ७० किलोमीटर अंतरावर असलेल्या आलापल्लीच्या जंगलात अनेक वर्षांपासून रानगव्यांचे अस्तित्व नाही. अशावेळी रानगवा आढळून आल्याने अाता या भागात रानगवे पुन्हा आपले अस्तित्व निर्माण करु शकतात, असा अंदाज वर्तविला जात आहे. गडचिरोली जिल्ह़यात रानगव्याचे अस्तित्व दुर्मिळ होत चालले आहे. जंगलात सर्वत्र वणवा लागल्याचे चित्र दिसत असून, वणव्यामुळे जंगलातील उष्णतेत वाढ होत आहे. ही उष्णता रानगवे व अन्य पशु, पक्ष्यांसाठी जीवघेणी ठरत आहे. त्यामुळे उपरोक्त रानगवा भटकत भटकत पुन्नागुडमच्या जंगलात आला असावा, असा अंदाज वनाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. वनपरिक्षेत्राधिकारी एच.जी.मडावी, वनपाल योगेश शेरेकर, सुधीर सुरपाम, प्रवीण शिरपूरकर, ज्ञानेश्वर गजबे, अनिल झाडे, संतोष पडालवार, नागोराव सिडाम, वन्यजीवप्रेमी मोहनिश मादेशी, अजिंक्य बेझलवार, रोहन दुर्गे, आदित्य चौधरी रानगव्यांच्या संरक्षणासाठी प्रयत्नशिल आहेत.