विदर्भात कापड गिरण्या सुरु करण्यासाठी उद्योजकांनी पुढे यावे- नितीन गडकरी

0
12

अमरावती : विदर्भात कापूस उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात आहेत. शेतकऱ्याच्या होणाऱ्या आत्महत्या हा चिंतेचा विषय झाला आहे. शेतकऱ्याच्या आत्महत्या रोखण्यासाठी आणि बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी विदर्भात कापड गिरण्या सुरु करण्यासाठी उद्योजकांनी पुढे यावे, असे आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक व जलवाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी उद्योजकांना केले.

विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात श्री. गडकरी यांनी वस्त्रोद्योगाला चालना देण्यासाठी काय उपाययोजना कराव्या लागतील ? या पार्श्वभूमीवर उद्योजक, लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांसमवेत चर्चा केली व वस्त्रोद्योगासाठी येणाऱ्या समस्या उद्योजकांकडून जाणून घेतल्या. याप्रसंगी पालकमंत्री प्रवीण पोटे-पाटील, खासदार सर्वश्री आनंदराव अडसूळ, प्रतापराव जाधव, रामदास तडस, राष्ट्रीय वस्त्रोद्योग महामंडळाचे चेअरमन प्रेमचंद्र वैश्य, वस्त्रोद्योगचे अतिरिक्त मुख्य सचिव सुनिल पोरवाल आदी उपस्थित होते.

श्री. गडकरी म्हणाले, विदर्भातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना कापसाचा भाव देणे आवश्यक आहे. सोलर चरख्याद्वारे सूत काढण्याचे यंत्र विकसित झाले आहे. हा चरखा प्रत्येक कापूस उत्पादक शेतकऱ्यांना देऊन त्यांनी तयार केलेले सूत कापड उद्योजकांनी खरेदी करावे. यामुळे या शेतकरी कुटुंबाला घरीच रोजगार उपलब्ध होईल. त्याचप्रमाणे कापूस आणि पऱ्हाटी काढण्याचे नवीन यंत्र तयार झाले आहे. या यंत्राच्या वापराने देखील शेतकऱ्याला कमी वेळात कापूस वेचण्यास मदत होणार असून पऱ्हाटीपासून गॅसही मिळेल, असा या यंत्राचा दुहेरी उपयोग आहे. याद्वारे शेतकऱ्यांना रोजगार मिळू शकतो, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

विदर्भात कापड गिरण्या सुरु झाल्या पाहिजे. ह्या सुरु करण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाकडून उद्योजकांना कोणत्या सवलती आणि कोणत्या सुविधा द्याव्या लागतील याबाबत उद्योजकांनी राज्य सरकारमार्फत केंद्राकडे प्रस्ताव पाठवावा, अशा सुचनाही श्री. गडकरी यांनी केल्या. यावेळी त्यांनी उद्योजकांच्या समस्या जाणून घेतल्या. 

औद्योगिक विकास महामंडळाद्वारे मिळणारे प्लॉट, त्याठिकाणी वीज, पाणी, रस्ते व इतर सुविधांची आवश्यकता आहे. विस्तारित उद्योग युनिटचा विचार करणे, पर्यावरण ना हरकत प्रमाणपत्र आदी अडचणी उद्योजकांनी श्री.गडकरी यांच्या निदर्शनास आणून दिल्या. उद्योजकांच्या समस्या सोडविण्यासाठी केंद्र आणि राज्य शासन प्रयत्न करेल, अशी ग्वाही देत श्री. गडकरी म्हणाले, उद्योजकांनी स्थानिक बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करुन द्यावा. त्यांना कोणत्या प्रकारचे प्रशिक्षण देण्याची आवश्यकता आहे, याबद्दल सांगावे म्हणजे तसे प्रशिक्षण सुरु करता येईल. दीनदयाल कौशल्य योजनेअंतर्गत असे प्रशिक्षण बेरोजगारांना देऊन त्यांना रोजगार देता येईल असे त्यांनी सांगितले.

या बैठकीला विविध राज्यातून वस्त्रोद्योग व्यवसायातील उद्योजक, स्थानिक उद्योजक, आमदार डॉ.सुनिल देशमुख, ॲड.यशोमती ठाकुर, डॉ.अनिल बोंडे, रवी राणा, विरेंद्र जगताप, विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजुरकर, जिल्हाधिकारी किरण गित्ते, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल भंडारी, उद्योग क्षेत्रातील अधिकारी उपस्थित होते.