राज्यघटनेमुळे सामाजिक समता प्रस्थापित झाली – अरुण शिंदे

0
7

अकोला : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असलेली सामाजिक समता, बंधुभाव व मुलभूत हक्क याबाबी त्यांनी भारताच्या राज्यघटनेत समाविष्ट केल्या. त्यामुळे सामाजिक समता निर्माण झाली. ही राज्यघटना प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी अरुण शिंदे यांनी केले.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमीत्य दि. 8 एप्रिल ते 14 एप्रिल 2015 पर्यंत सामाजिक समता सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहाचे उद्घाटन जिल्हाधिकारी कार्यालयातील छत्रपती सभागृह येथे जिल्हाधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी विभागीय जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती क्र.2 चे उपायुक्त सुरेंद्र पवार, उपविभागीय अधिकारी संजय खडसे, व जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील यांची उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी म्हणाले, शिक्षणामुळे मनुष्याला स्वाभिमानी जीवन जगता येते. त्याच्यात आत्मविश्वास निर्माण होतो. यामुळे प्रत्येकाने शिक्षणघेणे आवश्यक आहे.
सामाजिक विषमता दूर करुन एकस्तर समाज निर्माण करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन श्री. खडसे यांनी व्यक्त केले. तर शिका, संघटीत व्हा आणि संघर्ष करा हा संदेश देणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना समताधिष्ठित समाज हवा होता. त्यांच्या जयंती निमित्त आयोजित या सप्ताहामधुन समतेचा संदेश देण्याचे काम व्हावे, अशी अपेक्षा जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील यांनी व्यक्त केली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहाय्यक आयुक्त शरद चव्हाण, सूत्रसंचालन प्रकाश अंधारे तर आभारप्रदर्शन वरीष्ठ समाजकल्याण निरीक्षक संदीप पुसदकर यांनी केले.