योजना लाभार्थ्यापर्यंत पोहचविण्यात माध्यमांची भूमिका महत्त्वाची- दिलीपकुमार राठोड

0
11

चंद्रपूर : शासनाच्या लोकहिताच्या योजना सामान्य नागरिकांपर्यत पोहचविण्यात माध्यमांची भूमिका महत्त्वाची असल्याचे मत चंद्रपूर जात पडताळणी समितीचे उपआयुक्त दिलीपकुमार राठोड यांनी व्यक्त केले.
सामाजिक समता सप्ताहनिमित्त सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, जिल्हा माहिती कार्यालय व श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने प्रसारमाध्यम प्रतिनिधींसाठी एक दिवशीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यावेळी श्री. राठोड बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष गोपाळकृष्ण मांडवकर तर प्रमुख पाहुणे म्हणून समाज कल्याण विभागाचे प्रसाद कुळकर्णी, जिल्हा माहिती अधिकारी रवी गिते, जिल्हा समाज कल्याण अधिकारी विजय वाकुलकर आदी उपस्थित होते.
राठोड म्हणाले, सामाजिक न्याय विभागाने सामान्य नागरिकांच्या विकासाच्या व उत्थानाच्या अनेक योजना तयार केल्या आहेत. या योजना सामान्य माणसापर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न शासन आपल्या परीने करीत असते. मात्र माध्यमाची साथ मिळाल्यास नागरिकांना योजनांचा मोठ्या प्रमाणात लाभ होण्यास मदत होते. माध्यमांनी सकारात्मक भूमिका ठेऊन जनहिताच्या योजना लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी मदत केल्यास खऱ्या अर्थाने सामाजिक समता प्रस्तापित होण्यास मदत होईल.
मांडवकर म्हणाले, शासनाच्या योजना सामान्य नागरिकांपर्यंत पोहचविण्यासाठी माध्यमांनी नेहमीच सहकार्य केले आहे. यापुढेही सामाजिक न्याय विभागाला सहकार्य करण्याची माध्यमाची भूमिका राहणार आहे. शासकीय योजनांचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांच्या यशकथा सामाजिक न्याय विभागाने तयार कराव्यात, त्यास माध्यमे प्रसिध्दी देतील. सर्व विभागाच्या योजनांची माहिती असलेली पुस्तिका तयार करण्याच मांडली. विजय वाकुलकर आणि प्रसाद कुळकर्णी यांनीही यावेळी विचार व्यक्त केले. तर इतर मागासर्वीय महामंडळाचे व्यवस्थापक गजानन शेंडे, अन्नाभाऊ साठे विकास महामंडळाचे व्यवस्थापक दिलीप खडसे, सहाय्यक प्रकल्प अधिकारी अशोक वहाणे व उपविभागीय कृषी अधिकारी एस.जी.काचोळे यांनी आपआपल्या विभागाच्या योजनांची माहिती दिली.
कार्यक्रमाचे संचालन संजय देवकाते यांनी केले. कार्यशाळेस माध्यम प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.