जर्मनीच्या चान्सलर अँजेला मार्केल यांना पंतप्रधानांनी दिले महाराष्ट्र भेटीचे निमंत्रण

0
16

मुंबई : जर्मनी येथे सुरू असलेल्या उद्योग-व्यापार मेळाव्यात राज्यातील गुंतवणूक संधींचे व्यासपीठ असलेल्या ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’ या आकर्षक स्टॉलला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट दिली. महाराष्ट्रात जर्मन उद्योग चांगली कामगिरी करीत असून आपण महाराष्ट्राला आवर्जून भेट द्यावी, असे निमंत्रण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जर्मनीच्या चान्सलर अँजेला मार्केल यांना दिले.राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दोघांचे स्वागत केले.
जागतिक पातळीवरील प्रसिद्ध ‘हॅनोव्हर मेसी 2015’ या उद्योग-व्यापार मेळाव्यात इंडो-डॅनिश प्रतिनिधींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यावेळी महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी पोषक वातावरण तयार करण्यासाठी गुंतवणुकदारांना येणाऱ्या प्रशासकीय अडचणी दूर करण्यात येत आहेत. त्यामुळे राज्यात गुंतवणूक करण्यास इच्छूक सर्व उद्योगांचे स्वागतच केले जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी इंडो-डॅनिश फोरमचे प्रतिनिधी अजय चौहान आणि जवाहरलाल माटू यांना दिले.
चार दिवस चालणाऱ्या या परिषदेत विविध गुंतवणूक समुहांशी मुख्यमंत्री आणि उद्योगमंत्री चर्चा करणार आहेत. यामध्ये सोमवारी मर्सिडीजचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जीएसएबी इलेक्ट्रोटेक्निक, फ्लॅन्सचेनवेर्क थाई आदींसोबत बैठका पार पडल्या. यावेळी किर्लोस्कर इंटरनॅशनल पंपचे प्रमुख संजय किर्लोस्कर यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. पुण्यातील इंजिनिअरींग उत्पादनांच्या वाढीसंदर्भात त्यांनी चर्चा केली. तसेच जी अँड बी मेटल कास्टिंग प्रा. लि., इंडो-युएस एमआयएम टेक प्रा. लि. यांच्याशी देखील चर्चा केली. वेस्टाज टर्बाइनला महाराष्ट्रात येण्याचे निमंत्रण दिले.
या मेळाव्यात जगातील विविध नामांकित उद्योगसमूह व व्यापारी संस्थांच्या प्रतिनिधींसह संबंधित क्षेत्रातील मान्यवर सहभागी झाले आहेत. त्याचबरोबर देशातील विविध खासगी, सरकारी कंपन्या तसेच अनेक भारतीय उद्योगसमुहांनी आपली उत्पादने प्रदर्शित केली आहेत. भारतीय कंपन्यांनी या मेळाव्यात यंदा प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदवला आहे.
दरम्यान, भारतीय वेळेनुसार सोमवारी दुपारी जर्मनीला पोहोचल्यानंतर मुख्यमंत्र्यांचे स्वागत करण्यासाठी आलेल्या महाराष्ट्रातील विविध उद्योजकांनी महाराष्ट्रात उद्योगांच्या उभारणीसाठी शासन देत असलेल्या प्रोत्साहनाबद्दल समाधान व्यक्त केले. भारतीय वेळेनुसार रात्री उशिरा महाराष्ट्रातील गुंतवणूक संधी या विषयावर मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी संवाद साधला.