डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे विचार प्रगतीसाठी मार्गदर्शक

0
24

सामाजिक समता सप्ताह : प्रबोधन कार्यक्रमातील वक्त्यांचे मत
गोंदिया:भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी देशातील सर्व घटकांना पुढे ठेवून आदर्श राज्यघटना लिहिली. देशातील शोषित, पिडीत, वंचित घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न त्यांनी केला. डॉ.आंबेडकरांचे विचार प्रत्येकाच्या प्रगतीसाठी मार्गदर्शक असल्याचे मत प्रबोधन कार्यक्रमातील वक्त्यांनी व्यक्त केले.
(ता.१३) सामाजिक न्याय भवन येथे सामाजिक समता सप्ताह निमीत्ताने सामाजिक क्षेत्रातील वक्त्यांनी प्रबोधन कार्यक्रमात आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दलितमित्र डॉ.राऊत हे होते. कार्यक्रमाचे उदघाटन सत्यशोधक प्रबोधनकार शुद्धोधन शहारे यांनी केले. प्रमुख अतिथी म्हणून सामाजिक कार्यकर्त्या प्रा.सविता बेदरकर व साहित्यिक युवराज गंगाराम, जि.प.चे समाजकल्याण अधिकारी सुरेश पेंदाम यांची उपस्थिती होती.
उदघाटक म्हणून बोलतांना श्री.शहारे म्हणाले, बहुजन हिताय, बहुजन सुखाय हा संदेश तथागत गौतम बुद्धानी दिला. या संदेशाचा आदर्श पुढे ठेवूनच देशाच्या प्रगतीसाठी व जनतेच्या कल्याणासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी अथक परिश्रम घेतले. सामाजिक समता प्रस्थापित होण्यासाठी त्यावर आधारित संस्काराचे बिज आपल्यामध्ये रुजविणे आवश्यक आहे. सर्वांचे कल्याण करण्यासाठी सामाजिक न्याय विभाग काम करतो. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे विचार हे प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे. तथागत गौतम बुद्ध व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आचरणात आणून सामाजिक समता निर्माण होईल.
प्रा.श्रीमती बेदरकर म्हणाल्या, जगातील पहिला समीक्षक तथागत गौतम बुद्ध आहे. समाजातील तळागाळातील लोकांना प्रबोधन करणारे महात्मा ज्योतिबा फुले हे सत्यशोधक समाजसुधारक आहेत. वंचितांच्या घरामध्ये प्रकाश देण्याचे काम महात्मा फुले यांनी केले. स्त्री-पुरुष समतेचा विचार सावित्रीबाई फुल्यांनी मांडला. यांच्या विचाराचा आदर्श पुढे ठेवून डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी काम केले. समाजाच्या कल्याणासाठी डॉ.आंबेडकरांनी प्रचंड त्याग केला. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून सर्वांना मतदानाचा अधिकार दिला. हिंदूकोड बिलातून स्त्रीयांना आत्मसन्मानाने जगण्याचा अधिकार मिळवून दिला. डॉ.आंबेडकरांचे स्वप्न साकार करण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करावे. त्यांच्या आदर्श विचारावर वाटचाल करावी.
युवराज गंगाराम म्हणाले, शिका संघटित व्हा व संघर्ष करा असा मुलमंत्र डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी दिला. प्रत्येकाची वर्तणूक ही प्रज्ञा शिल आणि करुणा यावर आधारित असली पाहिजे. समाजातील सर्वांच्या कल्याणासाठी बहुजन हिताय, बहुजन सुखाय हा संदेश महत्वाचा आहे. डॉ.आंबेडकर हे एका विशिष्‍ट समाजाचे उद्धारक नसून ते देशातील शोषित, पिडीत, दलित, वंचित यासह सर्वांचे उद्धारक आहेत.
दलितमित्र डॉ.राऊत अध्यक्षस्थानावरुन म्हणाले, महाराष्ट्र ही साधू-संतांची भूमी आहे. विचारवंत समाजाला दिशा देण्याचे काम करतात. भारतीय राज्यघटनेने प्रत्येकाला माणूस म्हणून जगण्याची संधी दिली आहे. प्रत्येकाने पंचशील तत्वाचे पालन केले पाहिजे. प्रत्येकाने वाचनालयात जावून महापुरुषांच्या जीवनावर आधारित असलेल्या पुस्तकांचे वाचन करुन आपल्या ज्ञानात भर घालावी असेही ते म्हणाले.
यावेळी जनसेवा कलापथक मंडळ भडंगा येथील कलावंत घनश्याम टेंभूर्णीकर व त्यांच्या सहकार्यांनी सामाजिक समता प्रस्थापित करण्याबाबत प्रबोधन कार्यक्रम सादर केला. प्रास्ताविक व उपस्थितांचे आभार समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त सुनील जाधव यांनी मानले. संचालन राकेश रामटेके यांनी केले. कार्यक्रमाला नागरिकांची मोठ्यासंख्येने उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समाजकल्याण निरिक्षक अंकुश केदार, बापु चव्हाण, विनोद कावडे, राजेश खरोले, लक्ष्मण खेडकर, अरुण पराते यांनी परिश्रम घेतले.