पुढील वर्ष सामाजिक न्याय वर्ष म्हणून साजरे करणार- राजकुमार बडोले

0
15

मुंबई : धर्म, जातपात याच्यापुढे जाऊन भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार संविधानाच्या मार्गाने जनमाणसात रुजविण्यासाठी डॉ.आंबेडकर सामाजिक समता सप्ताहाच्या माध्यमातून आपण प्रयत्न करुया. २०१५-१६ हे वर्ष शासनातर्फे सामाजिक न्याय वर्ष म्हणून साजरे करण्यात येईल, असे प्रतिपादन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी आज येथे केले.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग व प्रजासत्ताक भारत संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने गेट वे ऑफ इंडिया येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘सामाजिक समता सप्ताह’ कार्यक्रमात श्री.बडोले बोलत होते. यावेळी सामाजिक न्याय विभागाचे सचिव उज्वल उके, समाज कल्याण आयुक्त रणजित सिंह देओल, अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त हर्षदीप कांबळे, प्रादेशिक उपायुक्त यशवंत मोरे, मुंबई शहरच्या सहाय्यक आयुक्त श्रीमती शेरे, मुंबई उपनगरचे सहाय्यक आयुक्त अविनाश देवसटवार, आयकर आयुक्त सुब्बचन रामसाहेब, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे महासंचालक चंद्रशेखर ओक, संचालक (प्रशासन) देवेंद्र भुजबळ तसेच प्रजासत्ताक भारत संघटनेचे अमोल मडामे आदी मान्यवर उपस्थित होते.

राज्य शासनाच्या प्रयत्नाने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी इग्लंडमध्ये वास्तव्य केलेले निवासस्थान नुकतेच राज्य शासनाकडे हस्तांतरित झाले आहे, असे सांगून श्री.बडोले म्हणाले की, त्याच पद्धतीने तेथील लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्येही डॉ.बाबासाहेब आंबेडकर चेअर निर्माण करण्यासाठी शासनातर्फे कसोशीने प्रयत्न करण्यात येतील. त्यांच्या अनुयायांच्या मागणीनुसार गेट वे ऑफ इंडिया येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारण्यासाठी शासनातर्फे सकारात्मक प्रयत्न करण्यात येतील. जगात मोठ्या प्रमाणात डॉ.आंबेडकर यांची जयंती साजरी होत आहे, ही गौरवाची बाब आहे.
आपले मनोगत व्यक्त करताना प्रधान सचिव उज्वल उके म्हणाले की, तुलनेने मागे राहिलेल्या समाज बांधवाना मदतीचा हात देऊन त्यांना मुख्य प्रवाहात आणणे हेच शासनाचे ध्येय असून मागासवर्गीय महिलांसाठी विशेष योजना आखण्यात येत आहेत. सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजना तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी शासन सकारात्मक प्रयत्न करीत आहे.

‘लोकराज्य’विशेषांकाचे प्रकाशन
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या जीवनावर आधारित विशेष लेख असलेल्या ‘लोकराज्य एप्रिल २०१५’ या अंकाचे प्रकाशन सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते करण्यात आले. या अंकामध्ये डॉ.आंबेडकर यांच्या कर्तृत्वाच्या विविध पैलुंचे दर्शन घडविणाऱ्या अभिवादन महामानवाला, घटनेचे शिल्पकार, नवे प्रेरणास्थान, परिवर्तनाचा मंत्र, कर विकासोन्मुख हवेत, महिलांचे कैवारी, युगपुरुषाच्या आठवणी, बाबासाहेबांची तैलचित्रे इत्यादी लेखांचा समावेश आहे. डॉ. रुपा कुलकर्णी-बोधी, डॉ. प्रदीप आगलावे, प्रा. शैलेश घोंगडे, मिलींद मानकर, डॉ. सरोज आगलावे या मान्यवरांनी हे लेख लिहिले आहेत.
या अंकात अर्थसंकल्प २०१५ चे विस्तृत विश्लेषण अर्थतज्ज्ञ मुकुंद लेले यांनी केले आहे. यवतमाळ जिल्ह्यातील एका खेड्यात मुख्यमंत्र्यांनी घालविलेल्या रात्रीचा विस्तृत रिपोर्ताज, केंद्रीय रसायने व खते राज्यमंत्री हंसराज अहिर, सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या विशेष मुलाखती, एक दिवस मंत्र्यांसोबत या सदरासाठी आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांच्या व्यक्तीमत्वाचा व दिनचर्येचा घेतलेला वेध, नूतनीकरण करण्यात आलेल्या तारापोरवाला मत्स्यालयावर आधारित फोटोफिचर यांचाही समावेश आहे.
या अंकापासून ‘महाराष्ट्रातील गडकिल्ले’ हे नवे सदर प्रसिद्ध इतिहासतज्ज्ञ निनाद बेडेकर हे लिहिणार आहेत. या सदरातील पहिला लेख या अंकात समाविष्ट करण्यात आला आहे. याशिवाय प्रेरणा भ्रमंती, निरामय, दिल्लीतील महाराष्ट्र ही नेहमीची सदरे आहेतच.