फोक्सवॅगन महाराष्ट्रातील विस्तार वाढविणार; हॅनोव्हर औद्योगिक मेळाव्यात मुख्यमंत्र्यांचे ‘मिशन महाराष्ट्र’

0
14

हॅनोव्हर : वाहननिर्मिती उद्योगातील आघाडीच्या फोक्सवॅगन या समुहाने महाराष्ट्रातील आपला विस्तार अधिक वाढविण्याचे ठरविले असून याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची या समुहाशी झालेली चर्चा अतिशय यशस्वी ठरली आहे.

हॅनोव्हर येथील व्यापार-औद्योगिक मेळाव्यातील मुख्यमंत्र्यांचे ‘मिशन महाराष्ट्र’ अभियान वेगाने राबविले जात आहे. त्याला जर्मन उद्योगसमुहांकडून उत्साहवर्धक प्रतिसाद मिळत आहे. मुख्यमंत्र्यांनी मंगळवारी फोक्सवॅगनच्या संचालक मंडळाशी विस्ताराने चर्चा केली. फोक्सवॅगन हा वाहननिर्मिती उद्योगातील एक आघाडीचा समूह असून जागतिक पातळीवर आपल्या विस्तारात या समुहाने भारतातील निर्मिती केंद्रांना अधिक प्राधान्य दिले आहे. त्यामुळे या समुहाशी चर्चेबाबत अधिक औत्सुक्य होते.

महाराष्ट्र सरकारच्या वतीने फोक्सवॅगनशी झालेली चर्चा यशस्वी ठरली आहे. फोक्सवॅगनसाठी लागणाऱ्या अनेक सुट्या भागांचे उत्पादन भारतात लहान आणि मध्यम उद्योजकांच्या माध्यमातून व्हावे हा या बैठकीचा मुख्य उद्देश होता. राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांच्या (आयटीआय) माध्यमातून फोक्सवॅगनने प्रशिक्षित मनुष्यबळाची निर्मिती करावी, ही सरकारची विनंती समुहाच्या संचालक मंडळातील ज्येष्ठ सदस्य थॉमस उल्ब्रिच यांनी मान्य केली आहे. या चर्चेत थिसनक्रप, डव्वा, कुका रोबोटिक्स, वोको आदी उद्योगसमुहांच्या प्रतिनिधींचा समावेश होता. या कंपन्यांच्या राज्यातील गुंतवणुकीतील विविध पातळ्यांवर येणारे अडथळे प्रशासनाकडून तातडीने दूर केले जातील, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.

एसएएबी या संरक्षणविषयक उपकरणांची निर्मिती करणाऱ्या स्विडीश समुहाच्या प्रतिनिधींशी राज्याच्या शिष्टमंडळाने चर्चा केली. हा समूह रडार यंत्रणा, क्षेपणास्त्रांशी संबंधित उपकरणे, हलकी विमाने आदींची निर्मिती करतो. या समुहाने देशातील संरक्षण क्षेत्रात आपला सहयोग देण्यासह महाराष्ट्रातही आपले प्रकल्प स्थापित करावेत, यादृष्टीने सकारात्मक चर्चा झाली.