पेट्रोल ८० पैशांनी स्वस्त;डिझेलमध्ये १.३० रुपयांची कपात

0
13

वृत्तसंस्था
नवी दिल्ली-आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत पुन्हा मोठी घसरण झाल्यामुळे त्याचा फायदा देशातील ग्राहकांना देत सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांनी आज बुधवारी पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत कपात जाहीर केली आहे. बुधवारी मध्यरात्रीपासूनच ही दरकपात अमलात आली.
पेट्रोलच्या प्रतिलिटर किमतीत ८० पैसे, तर डिझेलच्या प्रतिलिटर किमतीत १.३० रुपयांची कपात करण्यात आली आहे. यात स्थानिक विक्रीकर किंवा व्हॅटचा समावेश नसल्याने प्रत्यक्षात दरकपात यापेक्षाही जास्त राहणार असल्याची माहिती इंडियन ऑईल कॉर्पोरेशनच्या अधिकार्‍याने वृत्तसंस्थेशी बोलताना दिली.
यापूर्वी, गेल्या २ एप्रिल रोजी पेट्रोलच्या किमतीत ४९ पैसे आणि डिझेलच्या किमतीत १.२१ रुपयांची कपात करण्यात आली होती. आजच्या निर्णयामुळे सामान्यांना आणखी दिलासा मिळणार असून, एकीकडे घाऊक महागाईचा दर विक्रमी नीचांकावर आला असतानाच, डिझेलमधील दरकपातीमुळे महागाई आणखी कमी होण्याची शक्यता आहे.
विशेष म्हणजे, २८ फेब्रुवारीला पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत ३ रुपयांपेक्षा जास्त वाढ करण्यात आली होती. त्यावेळी आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ झाल्याने दरवाढीचा निर्णय घेण्यात आला होता.