संसद हा लढाईचा आखाडा झालाय – राष्ट्रपतीं

0
12

नवी दिल्ली, दि. १४ – सध्या संसदेमध्ये लढाई असल्याचं चित्र असून ते बदलायला हवं संसदेमध्ये चांगल्या चर्चा वादविवाद व्हायला हवेत असं सांगताना राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी या अंगानं गंभीर विचार व्हायला हवा असं सांगत खासदारांचे कान टोचले आहे. ६९व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला देशाला संबोधित करताना मुखर्जी यांनी सगळ्या देशवासियांना शुभेच्छा दिल्या तसेच, लष्कराच्या जवानांसह नोबेल पदक विजेते कैलाश सत्यार्थी यांचे अभिनंदन केले.

लोकशाही व्यवस्था सध्या तणावाखाली असल्याचे सांगत त्यादृष्टीने विचार व्हायला हवे असा सल्ला राष्ट्रपतींनी दिला. भारताच्या गुरुशिष्य परंपरेचा उल्लेख करत सध्या शिक्षणक्षेत्रात असलेल्या समस्यांचं मुखर्जींनी सुतोवाच केलं. शिक्षकांना या देशात मान होता, विद्वत्तेचा सन्मान होता, आज अशी स्थिती आहे का यावर शिक्षणक्षेत्राशी संबंधितांनी विचार करावा असे ते म्हणाले. शिक्षणसंस्था प्रचंड वाढल्या असल्या तरी गुणवत्तेचा विचार केला तर काय स्थिती आहे असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

दहशतवादाचा मुकाबला कठोरपणे करण्यात येईल असे सांगतानाच, शेजारी राष्ट्रांनी त्यांच्या भूमीचा वापर भारताशी शत्रूत्व बाळगणा-यांना करायला द्यायला नको असा इशाराही त्यांनी पाकिस्तानला नाव न घेता दिला आहे. बांग्लादेशाशी झालेल्या सीमा कराराबाबत मुखर्जी यांनी आनंद व्यक्त केला. भारत हा विविधतेने नटलेला देश असून ते विविधता जपायला हवी असंही ते म्हणाले. मानवता हा परमधर्म असल्याचं सांगत शांती, मैत्री व सहयोगाचे महत्त्व त्यांनी अधोरेखीत केले.
भारतीय अर्थव्यवस्था चांगल्या गतीने वाढत असून आर्थिक सुधारणाही होऊ घातल्या असल्याचे मुखर्जी म्हणाले.