योग्य नियोजनातून निधी निर्धारित वेळेत खर्च करा – पालकमंत्री बडोले

0
11

जिल्हा नियोजन समिती सभा

गोंदिया,दि.१४ : जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी जिल्हा नियोजन समितीची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. विविध यंत्रणांना वैयक्तीक लाभाच्या व सामुदायिक विकासासाठी या समितीकडून निधी देण्यात येतो. यंत्रणांनी देण्यात येणारा निधी योग्यप्रकारे नियोजन करुन निर्धारित वेळेत खर्च करावा. असे निर्देश पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी दिले.
जिल्हा नियोजन समितीची सभा आज १४ ऑगस्ट रोजी जिल्हा नियोजन समितीच्या नविन सभागृहात आयोजित करण्यात आली. त्यावेळी पालकमंत्री बडोले बोलत होते. सभेला पालक सचिव डॉ.पी.एस.मीना, जि.प.अध्यक्ष श्रीमती उषा मेंढे, खा.अशोक नेते, आमदार सर्वश्री गोपालदास अग्रवाल, विजय रहांगडाले, संजय पुराम, जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप गावडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ.संदिप पखाले यांची प्रमुख उपस्थिती होती.
पालकमंत्री बडोले म्हणाले, डिसेंबर २०१५ पर्यंत निधी खर्च व्हायला पाहिजे. यासाठी यंत्रणांनी आराखडा तयार करावा. हा आराखडा जिल्हाधिकारी यांना दाखवून त्यामध्ये कोणत्याही त्रुटी राहणार नाही याची खात्री करावी. त्यामुळे निधी वेळेतच खर्च करता येईल. शेतकऱ्यांशी संबंधित असलेल्या अनेक कृषी विषयक योजनांचे प्रस्ताव लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन तयार करावे. गरजु शेतकऱ्यांना विविध कृषी विषयक योजनांचा लाभ देण्यासाठी कृषी विभागाने योग्य नियोजन करावे. त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत होईल. ५० टक्के पेक्षा जास्त निधी पुढील तीन महिन्यात यंत्रणांनी खर्च करावा.
जिल्ह्यात शेतीपुरक व्यवसाय असलेल्या दुग्ध व्यवसायाला चालना देण्याची आवश्यकता असल्याचे सांगून पालकमंत्री बडोले म्हणाले, पशुसंवर्धन विभागाने जास्तीत जास्त दुधाळ जनावरांचे वाटप करावे. तसेच शेळी-मेंढी गटांचेही वाटप करावे. मुलींच्या शिक्षणात खंड पडू तसेच त्या शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी घर ते शाळा परत घरी येण्यासाठी सायकलींचे मोठ्या प्रमाणात वाटप करावे.
जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी घेतलेल्या कर्जाचे पुनर्गठण करण्याचे निर्देश देऊन पालकमंत्री बडोले म्हणाले, धान उत्पादक शेतकऱ्यांनी धान खरेदी केंद्रावर विकलेल्या धानाचे पैसे वेळेत शेतकऱ्यांना देण्यासाठी पणन विभाग व आदिवासी विकास महामंडळाने लक्ष दयावे. तसेच धानाची भरडाई त्वरित करुन घ्यावी. जिल्ह्यातील विविध विभागातील रिक्त पदांचा आढावा जिल्हाधिकाऱ्यांनी घ्यावा. संबंधित विभागाकडून रिक्त पद भरती बाबतची कार्यवाही त्वरित करता येईल असेही पालकमंत्र्यांनी सांगितले.
पालक सचिव डॉ.मीना म्हणाले, आरोग्य केंद्र व उपकेंद्राच्या इमारतीचे बांधकाम करतांना बांधकामाची गुणवत्ता उत्कृष्ट असली पाहिजे. निधीची मागणी वेळेत करावी. यंत्रणांनी विविध निधीतील कामे करतांना कामाची गुणवत्ता व योग्य लाभार्थ्यांची निवड केली पाहिजे असेही ते म्हणाले.
खासदार नेते म्हणाले, जिल्ह्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची अनेक पदे रिक्त असल्यामुळे अनेक योजना राबवितांना अडचणी निर्माण होत आहे. त्यामुळे निधी वेळेत व पूर्णपणे खर्च होत नाही. त्यामुळे योजना प्रभावीपणे राबविल्या जात नाही.
आमदार अग्रवाल म्हणाले, गोंदिया तालुक्यातील खमारी प्राथमिक आरोग्य केंद्र व चार उपकेंद्राची कामे मंजूर करुन त्यासाठी निधी उपलब्ध करुन दयावा. तसेच अधिकारी व कर्मचाऱ्यांची रिक्त पदेही तातडीने भरली जावी अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
आमदार रहांगडाले म्हणाले, अदानी प्रकल्पात बाहेर राज्यातील ८० टक्‍क्यांपेक्षा जास्त लोक काम करीत आहे. जिल्ह्यातील सुशिक्षीत व प्रशिक्षीत असलेल्या युवकांना या प्रकल्पामध्ये रोजगार उपलब्ध झाला पाहिजे यासाठी प्रशासनाने लक्ष दयावे असे ते म्हणाले.
आमदार पुराम यांनी आदिवासी बांधवांसाठी असलेल्या विविध योजनांचा लाभ यंत्रणांनी आदिवासी बांधवांना दयावा. तसेच आदिवासी भागांमध्ये विविध विकास कामे जलदगतीने व्हावी अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
जिल्हा वार्षिक योजना सन २०१५-१६ मध्ये सर्वसाधारण योजनांसाठी ११४ कोटी ९२ लक्ष रुपये निधी अर्थसंकल्पीत असून विविध यंत्रणांना २६ कोटी ७७ लक्ष रुपये निधी वितरीत करण्यात आला आहे. अनुसूचित जाती उपयोजनेअंतर्गत ३५ कोटी १ लक्ष निधी अर्थसंकल्पीत असून १० कोटी निधी वितरीत करण्यात आला आहे. आदिवासी उपयोजनांतर्गत ५८ कोटी १० लक्ष निधी अर्थसंकल्पीत असून ४१ कोटी ६ लक्ष निधी वितरीत करण्यात आला. तर आदिवासी क्षेत्र बाह्य योजनेअंतर्गत १५ कोटी २६ लक्ष निधी अर्थसंकल्पीत असून ९ कोटी ८२ लक्ष रुपये निधी वितरीत करण्यात आला आहे.
आजच्या सभेत मासेमारीसाठीचे जाळे/बोटी यांच्या अनुदान मर्यादेत वाढ करण्याचा प्रस्ताव, जिल्ह्यातील विविध विभागाची रिक्त पदे प्राधान्याने भरण्याची कार्यवाही गडचिरोली जिल्ह्याप्रमाणे करण्याचा ठराव शासनाकडे सादर करण्याचा तसेच पाणीपुरवठा योजनेसाठी दोन-दोन, तीन-तीन गावांची स्वतंत्र पाणीपुरवठा योजना सुरु करणे, अंगणवाडी बांधकामासाठी नियमीत बजेटच्या किमान १५ टक्के निधीची तरतूद जीर्णावस्थेत असलेल्या अंगणवाडीच्या दुरुस्तीकरीता व स्वयंपाकगृहाच्या बांधकामाकरीता करणे आदी महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. यावेळी समितीच्या सदस्य आशा पाटील तसेच विविध यंत्रणांचे विभाग प्रमुख प्रामुख्याने उपस्थित होते. सभेचे प्रास्ताविक जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांनी केले. संचालन व उपस्थितांचे आभार बकुल घाटे यांनी मानले.