शेख जायद मस्जिदमध्‍ये मोदी-मोदीचे नारे

0
4

वृत्तसंस्था
अबु धाबी, दि.१६-
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रविवारी संयुक्त अरब अमिरातच्या दोन दिवसांच्या भेटीवर येथे दाखल झाले. व्यापार आणि दहशतवादविरोधी लढ्यात दोन्ही देशांचे सहकार्य बळकट करतानाच भारतात विदेशी गुंतवणूक आणण्यावरही पंतप्रधान भर देणार आहेत. विशेष म्हणजे, ३४ वर्षांनंतर या देशाला भेट देणारे नरेंद्र मोदी पहिलेच भारतीय पंतप्रधान ठरले आहेत.
‘हॅलो युएई, या भेटीबाबत मी अतिशय उत्सूक आहे. माझ्या या भेटीने भारत-अमिरात संबंध आणखी मजबूत होतील, असा विश्‍वास आहे,’ असे मोदी यांनी अबु धाबी येथे दाखल होताच ट्विटरवर नमूद केले.
विमानतळावर अबु धाबीचे नरेश शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांनी राजशिष्टाचार बाजूला सारून पंतप्रधानांचे भव्य स्वागत केले. यावेळी शेख मोहम्मद यांचे पाच बंधूही विमानतळावर प्रामुख्याने उपस्थित होते. पंतप्रधान मोदी उद्या सोमवारी अमिरातच्या नेतृत्वाशी विविध मुद्यांवर चर्चा करतील. त्यानंतर ते येथील भारतीय समुदायालाही संबोधित करणार आहेत.
अबु धाबी येथे आल्यानंतर पंतप्रधानांनी शेख झायेद मशिदीला भेट दिली. ही मशिद म्हणजे अद्‌भुत अशी इस्लामिक कलाकृतीच मानली जाते. अमिरातचे संस्थापक आणि पहिले अध्यक्ष शेख झयाद बिन सुल्तान अल नाहयान यांचे नाव या मशिदीला देण्यात आले असून, मक्का आणि मदिनानंतर जगातील तिसरी मोठी मशिद अशी तिची ओळख आहे.