एअर इंडियाचे वैमानिक संपावर

0
8

नवी दिल्ली,दि.२१- एअर इंडियामधील कामगारांशी संबंधित कायद्यांमध्ये ढवळाढवळ करणा-या केंद्र सरकारच्या प्रस्तावित बदलाला विरोध करण्यासाठी एअर इंडियाच्या वैमानिकांनी व्यवस्थापनासोबत असहकार आंदोलन सुरू केले आहे. त्याचा परिणाम शुक्रवारी विमान सेवेवर झाला.
एअर इंडियाच्या अनेक वैमानिकांनी शुक्रवारी सामूहिक रजा टाकल्याने अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय विमानांचे उड्डाण लांबणीवर पडले आहे.
केंद्र सरकारच्या या प्रस्तावित बदलांनंतर एअर इंडिया या सरकारी विमान कंपनीच्या वैमानिकांचा आणि अभियंत्यांचा कामगार हा दर्जा रद्द होणार आहे. कामाच्या ठिकाणी कामगार संघटना स्थापन करण्यास तसेच कामगारांना संपावर जाण्याचा त्यांचा हक्कही संपुष्टात येणार आहे. कामगार कायदा १९४७ अन्वये, ज्या कामगाराचे वेतन १० हजार रुपयांहून अधिक आहे, असे कर्मचारी कामगार नसून ते प्रशासकीय विभागात गणले जातात. त्यामुळे त्यांना कामगारांप्रमाणे संपावर जाता येत नाही. मात्र, वैमानिकांनी याला तीव्र विरोध केला आहे.
दरम्यान, वैमानिकच उपलब्ध नसल्यामुळे दिल्लीहून लंडनकडे जाणारे एअर इंडियाचे एआय ११५ या विमानाचे उड्डाण आठ तासांपेक्षा जास्त वेळ रखडले आहे. मुंबई-दिल्ली या दरम्यानची एअर इंडियाची अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणे यामुळे अनेक तासांपासून रखडली आहेत. मुंबईतील आठ विमानंसह देशभरातील ११ विमानांचे उड्डाण ऱखडले आहे. अनेक प्रवाशांनी याबद्दल संताप व्यक्त केला.