डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकाचे पंतप्रधानांच्या हस्ते भूमिपूजन

0
13

मुंबई दि.११-:- शिका, संघटित व्‍हा आणि संघर्ष करा असे शिकवणा-या डॉ. आंबेडकरांनी दिलेली ताकद कोणी हिसकावून घेऊ शकत नाही. बाबासाहेब नसते, तर मी पण नसतो. म्‍हणून बाबासाहेबांच्‍या विचारांचा जगभर प्रसार व्‍हावा. त्‍यांचे स्‍मारक हे शांतीचे ठिकाण झाले पाहिजे. असे मत नरेंद्र मोदी यांनी केले आहे. इंदू मिल येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्‍मारकाचे भूमिपूजन झाल्‍यानंतर ते सभेत बोलत होते. वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स येथील एमएमआरडीए मैदानात ही सभा पार पडली.
मुंबईतील चैत्यभूमीलगत असलेल्या इंदू मिलमध्ये हे भव्य स्मारक उभारले जाणार आहे. इंदू मिलमध्ये झालेल्या भूमिपुजनाच्या कार्यक्रमाला राज्यपाल चे. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रस्ते परिवहन आणि राजमार्ग मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय वस्त्रोद्योग राज्यमंत्री (स्वतंत्र कारभार) संतोषकुमार गंगवार, सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, खासदार रामदास आठवले, आमदार जोगेंद्र कवाडे, आमदार भाई गिरकर, भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, माजी खासदार प्रकाश आंबेडकर, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे डॉ. राजेंद्र गवई, मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय, एमएमआरडीएचे महानगर आयुक्त यु.पी.स.मदान आदी उपस्थित होते.

भूमिपुजनापूर्वी पंतप्रधानांनी चैत्यभूमी येथे येऊन डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना दिली. तसेच यावेळी येथे झालेल्या प्रार्थनेतही ते सहभागी झाले. यानंतर पंतप्रधान यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रस्तावित आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्मारकाच्या आराखड्याची पाहणी केली. इंदू मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचा भूमिपूजन कार्यक्रम जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावा यासाठी दूरदर्शनवरून त्याचे थेट प्रक्षेपण करण्यात आले.

भारतीय समाजव्यवस्थेत डॉ. बाबासाहेबांमुळेच दलित, आदिवासी, शोषित आणि महिला यांना सन्मानाने जगण्याचा अधिकार मिळाला. अशा महामानवाचे इंदु मिलच्या जागेवर आंतरराष्ट्रीय दर्जाचे भव्य स्मारक उभारले जावे, अशी जनतेची अनेक वर्षांची मागणी होती. ती मागणी आता पूर्ण होत आहे.

असे असेल स्मारक

इंदू मिल येथील साडेबारा एकर जागेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कर्तृत्वाला साजेशे असे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभारले जाणार आहे.
• नामवंत वास्तुविशारद शशी प्रभू यांनी हा आराखडा तयार केला आहे.
• मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे (एमएमआरडीए) या स्मारकाची जबाबदारी असणार आहे.
• इंडिया युनायटेड मिल नंबर 6 नॅशनल टेक्सटाईल कॉर्पोरेशन येथे हे स्मारक असणार आहे.
• या स्मारकाची प्रमुख वैशिष्ट्ये म्हणजे येथे स्मृती स्तूप, सभागृह, प्रेक्षागृह, वस्तुसंग्रहालय, ग्रंथालय, शोभिवंत बगीचे, वाहनतळ असणार आहे.
• आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक हे चैत्यभूमीच्या जवळ असून येत्या अडीच वर्षात हे पूर्ण होण्याचे प्रस्तावित आहे.