चौकशीच्या नावाखाली पोलिसांकडून दुकानदारांना त्रास

0
18

गडचिरोली दि.११-: पोलीस विभागातील साहित्य खरेदी घोटाळा प्रकरण उजेडात आल्यानंतर पोलीस विभागाकडून या प्रकरणाची कसून चौकशी सुरू आहे. मात्र गडचिरोली पोलीस रात्री बेरात्री रबर स्टॅम्प व प्रिटिंग प्रेस दुकानदारांना ठाण्यात बोलावून विचारणा करीत आहेत. तसेच वारंवार दुकानात येऊन चौकशी करीत आहेत. यामुळे दुकानदारांना त्रास होत असून व्यवसायावर परिणाम होत आहे, असा आरोप गडचिरोली शहरातील रबर स्टॅम्प, पिंट्रिंग प्रेस दुकानदारांनी शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेतून केला.
पत्रकार परिषदेला राजेंद्र चिलगेलवार, ताराचंद भांडेकर, नीलेश बद्दलवार, संदीप बाळेकरमकर, सतीश कुंभारे, आशुतोष कोरडे, नाना येर्रावार, सतीश मच्छेवार, सुरज दुधबावरे, विलास बागडे, राजेश सोनटक्के, विलास कुंभारे, मोहन संगणवार, सोमनाथ ठाकूर, नक्टू पेटकर व विलास दशमुखे उपस्थित होते. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, मागील तीन महिन्यांपासून गडचिरोली पोलीस ठाण्याचे पोलीस चौकशी करण्याच्या नावाखाली आमच्या दुकानात येऊन वेळी-अवेळी पोलीस ठाण्यात घेऊन जात आहेत. रात्री ११ ते १२ वाजेपर्यंत एखाद्या आरोपीसारखे बसवून ठेवून नाहक त्रास देत आहेत. यामुळे आम्हाला समाजात संशयाच्या नजरेने पाहिले जात आहे. परिणामी आमची प्रतिमा मलिन होत आहे.