‘मेक इन इंडिया सेंटर’चे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन

0
8

 

मुंबई : देशात विदेशी गुंतवणूक वाढविण्याच्या दृष्टीने शनिवारपासून सुरू झालेल्या ‘मेक इन इंडिया सप्ताहा’च्या ‘मेक इन इंडिया सेंटर’चा मुंबईच्या वांद्रे-कुर्ला संकुलात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शानदार शुभारंभ झाला. पोलंड, फिनलँड आदी देशांच्या पंतप्रधानांसह जगभरातील मान्यवर उद्योजकांनी या अभूतपूर्व सोहळ्याला उपस्थिती लावली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हाती घेतलेल्या उपक्रमांपैकी एक महत्त्वाकांक्षी उपक्रम म्हणून ‘मेक इन इंडिया’कडे पाहिले जाते. देशातील उत्पादन क्षेत्राला चालना देऊन विदेशी गुंतवणूक वाढावी आणि त्यातून देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकटी मिळावी यासाठी ‘मेक इन इंडिया’ अभियान देशभरात राबविले जात आहे. या अभियानांतर्गत दिनांक 13 ते 18 फेब्रुवारी 2016 या कालावधीत ‘मेक इन इंडिया सप्ताह’ राबविण्यात येत असून त्यानिमित्त मुंबईच्या वांद्रे-कुर्ला संकुलातील एमएमआरडीए मैदानावर भव्यदिव्य ‘मेक इन इंडिया सेंटर’ स्थापन करण्यात आले आहे. या सेंटरचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. यावेळी फिनलँडचे पंतप्रधान जुहा सिपीला, पोलंडचे पहिले उपपंतप्रधान प्रो.पिओत्र ग्लिन्स्की यांच्यासह महाराष्ट्राचे राज्यपाल चे.विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय वाणिज्य व उद्योग राज्यमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन, राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई, मुंबई उपनगरचे पालकमंत्री विनोद तावडे, उद्योग राज्यमंत्री प्रवीण पोटे-पाटील, मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय आदी मान्यवर उपस्थित होते.