ग्रंथोत्सवाच्या माध्यमातून समाजाला वैचारिक भूमिका मिळावी- प्रकाश एदलाबादकर

0
11

भंडारा : जगण्याला बळ देणारं, संभ्रमावस्थेत दिशा दाखविणारं आणि अशांत मन शांत करणारं साहित्य माणसा-माणसांना जोडत असतं. या ग्रंथोत्सवाच्या माध्यमातून समाजाला नवीन दिशा मिळावी. येथील जनतेला वैचारिक भूमिका मिळावी आणि ग्रंथातून जीवनाचं तत्वज्ञान समजावं यासाठी ग्रंथालयाचा धांडोळा घेवून त्यातील ज्ञान आत्मसात करायला पाहिजे, असे विचार ज्येष्ठ साहित्यिक प्रकाश एदलाबादकर यांनी व्यक्त केले.

मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, ग्रंथालय संचालनालय, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, जिल्हा ग्रंथालय संघ आणि जिल्हा माहिती कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने भंडारा ग्रंथोत्सव 2015 चे आयोजन नगरपरिषद महात्मा गांधी विद्यालय येथे करण्यात आले आहे. ग्रंथोत्सवाच्या उदघाटनप्रसंगी श्री. एदलाबादकर बोलत होते.

13, 14 आणि 15फेब्रुवारी या तीन दिवसीय ग्रंथोत्सवादरम्यान ग्रंथ प्रदर्शन व विक्री यासोबत विविध साहित्यिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाची पर्वणी राहणार आहे. यावेळी जिल्हा कोषागार अधिकारी अमित मेश्राम, प्रा. विनोद मेश्राम, निळकंठ रणदिवे, वामन तुरिले, जयश्री सातोकर, सतार खान, गांधी विद्यालयाचे मुख्याध्यापक बी. जी. वाघाये, हर्षल मेश्राम, निरंजन शिवणकर, जिल्हा ग्रंथालय अधिकारी खुमेंद्र बोपचे, जिल्हा माहिती अधिकारी मनीषा सावळे आदी उपस्थित होते.प्रास्ताविक श्री. बोपचे यांनी केले तर आभार श्रीमती सावळे यांनी मानले. तत्पूर्वी सकाळी गांधी विद्यालय येथून ग्रंथदिडी निघाली. समाजकल्याण सहाय्यक आयुक्त देवसुदन धारगावे यांनी ग्रंथाचे विधीवत पूजन करुन ग्रंथ दिंडी मार्गस्थ केली. यावेळी महात्मा गांधी विद्यालय व भागिरथा भास्कर विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषेत लेझिम नृत्य सादर केले.